मनपाचे दुर्लक्ष : लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासन, मात्र उपाययोजना नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराला लागून असलेल्या कानळदा रस्त्यावरील राजारामनगरात गेल्या १० वर्षांपासून मनपातर्फे परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन न टाकल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. लोकप्रतिनिधींनी निवडणुकांच्या वेळी आश्वासने दिली. मात्र, गेल्या दहा वर्षांत एकाही लोकप्रतिनिधीने आश्वासन पूर्ण केले नसल्याची खंत येथील रहिवाशांनी 'लोकमत' कडे व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर या परिसरात नागरी वस्ती वाढली. शहराला लागून हा परिसर असला तरी, या भागाची हद्द आव्हाने ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्याचे या रहिवाशांनी सांगितले. मात्र, संबंधित ग्रामपंचायतीकडून या ठिकाणी रस्ते, गटारी ना पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात आली असल्याचे रहिवाशांनी सांगितले. मात्र, शहराला लागून हा भाग असल्याने मनपा प्रशासनानेच या परिसरात सर्व मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी या नागरिकांमधून केली जात आहे. निवडणुकीच्या वेळेला लोकप्रतिनिधी येतात आणि पाण्याची समस्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन देतात. त्यानुसार गेल्या १० वर्षांत अनेक निवडणुका झाल्या. मात्र, एकही लोकप्रतिनिधीने अद्याप पाण्याची समस्या सोडविली नसल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना बोअरवेलचे पाणी प्यावे लागत असल्याचे या रहिवाशांनी सांगितले. सध्या उन्हाळा सुरू असल्याने येथील बोअरवेलचे पाणी कमी झाल्यामुळे पाण्याची समस्या अधिकच बिकट होत असल्याचेही रहिवाशांनी सांगितले.
इन्फो:
विकतचे घ्यावे लागतेय पाणी
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने येथील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून जारचे विकत पाणी घ्यावे लागत आहे. दररोज ५० रुपये खर्च पिण्याच्या पाण्यावर करावा लागत आहे. तर वापरण्यासाठी बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. आतापर्यंत पाण्यावर हजारो रुपये खर्च झाला आहे. तसेच या परिसरात गटारी व रस्ते नसल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
इन्फो :
गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे बोअरवेलचे पाणी तर कधी विकतचे पाणी वापरावे लागत आहे. उन्हाळ्यातही या बोअरवेल आटत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे खूपच हाल होत आहेत.
ज्योती भालेराव, रहिवासी
गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात पिण्याच्या पाण्यासह रस्ते व गटारींचीही समस्या कायम आहे. मनपाचे व लोकप्रतिनिधी यांचे येथील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. येथील सर्व समस्या माहीत असतानाही लोकप्रतिनिधी यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
लता पवार, रहिवासी
पिण्याच्या पाण्याची मनपाने पाईपलाईन न टाकल्यामुळे रहिवाशांना विकतचे पाणी तर कधी बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. मनपा व लोकप्रतिनिधी यांनी पाण्याच्या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच रस्ते व गटारीच्या समस्याही सोडवाव्यात.
पंकज सैदाने, रहिवासी
इन्फो
हा परिसर आव्हाने परिसरात असून, ग्रामपंचायत किंवा मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली नाही. त्यामुळे रहिवाशांना बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने पाण्याची समस्या सोडावी, ही आमची मागणी आहे.
नीलेश इंगळे, रहिवासी