- सुधीर चौधरी
यावल (जि. जळगाव) : दहावीच्या हिंदीच्या पेपरला विद्यार्थिनींनी कॉप्या बाहेर फेकल्याचे आढळून आल्याने चिंचोली ता. यावल येथील सार्वजनिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील केंद्रप्रमुखासह पाच जणांविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहावीच्या पेपरला कॉपी आढळून आल्यानंतर आतापर्यंत सामनेर, यावल आणि आता चिंचोली येथील हा तिसरा गुन्हा दाखल आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये केंद्रप्रमुख बाळू पितांबर पाटील, केंद्र उपप्रमुख सतीश रामदास पाटील, पर्यवेक्षक विनायक दगडू कोष्टी, पर्यवेक्षक कल्याणी राहुल महाले आणि स्वीटी विनायक पवार यांचा समावेश आहे. चिंचोली येथील माध्यमिक विद्यालयात शनिवारी इयत्ता दहावीचा पेपर होता. येथे फैजपूर येथील सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी दुपारी दोन वाजता भेट दिली.
त्यावेळी तीन वर्गातून विद्यार्थिनींनी कॉप्या बाहेर फेकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी यावलचे शिक्षणाधिकारी यांना सूचना करीत कारवाई करण्याचे आदेश दिले. गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.