जळगाव : कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. बारावीचे यापुढील उर्वरित पेपर आणि दहावीच्या परीक्षेलाही वातावरण असेच टाईट ठेवले गेले तर यंदा दहावी आणि बारावीच्या निकालातील गुणांचा फुगवटा १० टक्केने कमी होणार असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळेतच परीक्षा केंद्र होती. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बाहेरची मिळालेली आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियानातील बंदोबस्त, भरारी पथके, विविध उपाययोजना या सर्वांचा परिणाम यावर्षीचा दहावी आणि बारावीचा निकाल १० टक्के कमी लागण्यात होणार आहे. थोडक्यात गुणांचा फुगवटा कमी होईल. कडक धोरण, नियमांमुळे हे शक्य होणार आहे. परंतु याचा परिणाम केवळ शहरी भागातच जाणवेल. ग्रामीण भागाचे काय ? अशी प्रतिक्रिया शिक्षण तज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांनी दिली.
प्रशासनाने ही केंद्रे बदलावीत -केंद्राचा निकाल चांगला लागावा म्हणून आतमध्ये काय घडते, कोणाकोणाला काय मदत केली जाते हे उघड गुपित आहे. संवेदनशील केंद्र दर्शवून तेथे कॉपी होत असल्याचे एका अर्थी मान्य केले जात आहे. प्रशासनाने ही केंद्रे बदलायला हवीत. बंदोबस्त बाहेर कितीही लावला तरी आतमध्ये जे व्हायचे तेच होते, असेही भंडारी म्हणाले.
विद्यार्थ्यांना आकलन शक्ती कळेल
कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी प्रशासनाने केलेले नियोजन चांगले होते. बारावीचे उर्वरित पेपर आणि दहावीच्या परीक्षेसाठी याच पद्धतीने कडक अंमलबजावणी व्हावी. यामुळे निकालातील गुणांचा फुगवटा कमी होण्यास मदत होईल. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनाही आपली आकलन शक्ती कळून येईल, असे नंदिनीबाई कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. राहुल वराडे यांनी सांगितले.