जळगाव : कोरोना रुग्णालयाचा एक-एक कारभार समोर येत असून आता तर एक कोरोना बाधित वृद्ध महिला थेट कोरोना रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच पडून असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून काही वेळानंतर या वृध्द महिलेस कोरोना कक्षात दाखल करून घेण्यात आले आहे़ या घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून या प्रकाराचा व्हिडिओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे़कोरोना रुग्णालयातील कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असताना आता तर थेट कोरोना बाधीत रुग्णच रुग्णालयाच्या प्रवेश द्वारापर्यंत पोहचल्याचा प्रकार समोर आला आहे.आठ ते दहा दिवसांपूर्वी एरंडोल येथील वृद्ध महिलेचा मुलगा कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या वृद्ध महिलेलादेखील जळगाव कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक ती वृध्द महिला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर पडून असल्याचे एका सामाजिक कार्यकर्त्याच्या निदर्शनास आले. त्या सामाजिक कार्यकर्त्याने वृद्ध महिलेशी चर्चा करून सर्व माहिती घेतली आणि त्यानंतर तो व्हिडीओ एरंडोल येथील काही मित्रांना पाठवून त्या महिलेची ओळख पटविण्याची विनंती केली़ त्यामुळे हा व्हिडिओ काहीवेळातच व्हायरल झाला़शुक्रवारी आला बाधित असल्याचा अहवालप्रवेशद्वारावर पडून असलेली महिलेचा शुक्रवारी अहवाल आला असून तो कोरोना पॉझिटीव्ह आला़ तर दुसरीकडे कोविड रुग्णालय प्रशासनाने संबंधित वृद्ध महिलेच्या केस पेपरवर बेपत्ता असल्याचा शेरा मारला असल्याचीही माहिती मिळाली. ही महिला प्रवेशद्वारापर्यंत कशी आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ काही वेळानंतर हा प्रकार काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या वृध्द महिलेस कोरोना कक्षात दाखल करून घेतले आहे़ तर कोरोना बाधित रुग्ण अशा पद्धतीने बाहेर पडल्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.महिलेचा मुलगा व नातू दोन्हीही रुग्णालयात दाखल आहे. त्यामुळे महिला मानसिकदृष्ट्या खचली आहे. कर्मचऱ्यांवरही आरडाओरड करते. आता मात्र ही महिला वॉर्ड १ मध्ये दाखल आहे. केस पेपवर बेपत्ता लिहिल्याबाबात माहिती नाही.- डॉ. भास्कर खैरे, अधिष्ठाता
कोरोना बाधित वृद्ध महिला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:59 PM