लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून यात जळगाव शहरातील एका ६० वर्षीय पुरूषाचा समावेश असून शहरात सलग तीन दिवसांपासून मृत्यू होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मंगळवारी ३२ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. मृतांची संख्या १३४७ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी २७५ ॲन्टीजन चाचण्या करण्यात आल्या तर आरटीपीसीआरचे ७९६ अहवाल आलेत. यात अनुक्रमे १३ आणि १९ रुग्ण समोर आले आहेत. तर मंगळवारी ८०९ आरटीपीसीआरच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. दोन बाधितांच्या मृत्यूची नोंद असून यात एक जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील एक ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बीबानगरात ३ रुग्ण
शहरातील बीबा नगरात ३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यासह नवी पेठ २, शारदा कॉलनी, धांडे नगर, यशवंत नगर, हतनूर कॉलनी, समर्थ कॉलनी, शिवाजीनगर, भगीरथ कॉलनी या भागात प्रत्येकी १ रुग्ण समोर आला आहे.
गोलाणीत १५० तपासण्या
गोलाणी मार्केटमध्ये विक्रेत्यांच्या तपासण्यांना सुरूवात करण्यात आली आहे. यात पहिल्या दिवशी १५० जणांची कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. याचे अहवाल येत्या दोन दिवसात समोर येणार आहे.