लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : संपूर्ण राज्यासह जळगाव शहरात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते आहे. महापालिकेत अधिकाऱ्यांसह मनपा कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. याचा परिणाम महापालिकेच्या होणाऱ्या महासभेवरदेखील झाला आहे. कोरोनाचा सातत्याने वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता महासभा पुढील महिन्यातच होण्याची शक्यता आहे.
महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर नवीन महापौर जयश्री महाजन यांनी आपल्याकडे सूत्रे हाती घेतली आहेत. मात्र, महापालिकेतील सत्तांतरानंतर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात असल्याने महापालिकेतील काम करतानादेखील त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. शहरासाठी नवीन महापौरांकडून नवीन कामांबाबत काही प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. मात्र या प्रस्तावांना मंजुरी महासभेत मिळू शकते. सद्यस्थितीत ऑफलाइन महासभेला मंजुरी नसली तरी ऑनलाइन महासभादेखील आता घेणे कठीण झाले आहे. कारण महापालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात नगर सचिव सुनील गोराणे हेदेखील अनेक दिवसांपासून उपचार घेत आहेत. यामुळे सद्यस्थितीत महासभा घेण्याबाबत महापौर आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. त्यात जिल्हा प्रशासनाकडून ३० एप्रिल पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले. तसेच राज्य शासनाकडूनदेखील लॉकडाऊनबाबतदेखील लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे आता ३० एप्रिलनंतरच महासभेचे आयोजन होऊ शकते, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, ३१ मार्च रोजी सादर झालेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पाला महासभेची मंजुरी अद्याप मिळालेली नसली तरी अशा परिस्थितीत मनपा प्रशासनाकडून या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या वर्षीदेखील अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर लॉकडाऊनमुळे महासभा होऊ शकली नव्हती त्यामुळे मनपा प्रशासनाकडून अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, स्थायी समिती सभादेखील कोरोनामुळे रखडली असून, आता ऑनलाइन पद्धतीने स्थायी समिती सभा घेण्याबाबत मनपा प्रशासनाकडून विचार सुरू आहे.