कोविड १९अंतर्गत सन २०२०-२१ या वर्षात महामारीने हाहाकार उडाला. साथीच्या रोगामुळे मृत्यू झालेल्या मयताच्या शवाच्या अंत्यसंस्कारासाठी शासनातर्फे पालिका प्रशासनाने ठरावानुसार निविदा काढून नियमाप्रमाणे संस्थेला ठेका देण्याचे क्रमप्राप्त होते. सन २०२०च्या पहिल्या लाटेत पालिकेने ठराव करून निविदा काढून दि. २८ जुलै २०२० ला ‘महर्षी वाल्मिकी सफाई कामगार सुशिक्षित बेरोजगार सेवा सह. संस्था चिखली, जि. बुलढाणा या संस्थेस प्रति मृतदेह अंत्यविधी दर रु. ७ हजार ठरवून आरोग्य संचालनालयाचे निर्देशानुसार मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ठेका दिला होता. त्यावर मुदत नमूद नसल्याने तो वार्षिक असल्याचे संस्थेला सांगितले गेले. त्यानुसार न.पा.ने या संस्थेस रुपये ६ लाख ३ हजार २६० मात्र मोबदला देण्यात आला तर अद्याप काही बिले बाकी आहेत.
यातच दुसऱ्या लाटेत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने पुनश्च ७ एप्रिल २०२१ला ठेका देण्यासाठी निविदा काढली. तत्पूर्वी संस्थेला दिलेल्या ठेक्यासंदर्भात कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. नव्या निविदेनुसार पूर्वीच्या संस्थेसह अन्य ४ संस्थांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला. या वेळी प्रति मृतदेह विल्हेवाट रुपये १ हजार ९९९ एवढी कमीतकमी रक्कम सरिता करतारसिंग चांगरे (पाचोरा) यांनी निविदा भरली होती तर महर्षी वाल्मिकी सफाई, संस्था चिखली यांनीदेखील पूर्वीचे दर कमी करीत रुपये २ हजार ४९९ प्रति मृतदेह दर भरले होते.
असे असताना पालिका प्रशासनाने सूरज चंदू भैरू या व्यक्तीच्या नावे रु. ७ हजार याप्रमाणे दर निश्चित करून दि. १२ एप्रिल २०२१ रोजी कार्यादेश देऊन पालिकेचा कोणताही ठराव नसताना व्यक्तिशः ठेका दिल्याचे दिसून येत आहे.
वाढीव दराचा ठेका देण्याचा उद्देश काय?
निविदा प्रक्रियेनुसार कमीतकमी दराने ठेका देणे पालिकेच्या हिताचे असताना वाढीव दराचा व्यक्तिशः ठराव न करता ठेका देण्याचा प्रशासनाचा उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पहिल्या टप्प्यातील दरापेक्षा दुसऱ्या टप्प्यात संस्थेने दर एकदम कमी का भरले? पहिल्या टप्प्यात महर्षी वाल्मिकी सफाई कामगार संस्था चिखली यांनी ७ हजार या दराप्रमाणे मृतदेहाची विल्हेवाट लावून मोबदला घेतला. मात्र त्याच संस्थेने दुसऱ्या लाटेत रुपये २ हजार ४९९च्या कमी दराने निविदा एकदम कमी कशी भरली, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
उभयतांचे दावे - प्रतिदावे व मोबदला मिळण्यासाठी एकमेकांच्या विरोधात सरिता करतारसिंग चांगरे व सूरज चंदू भैरू यांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण झाले. मात्र मृतदेहाची विल्हेवाट लावूनही पाचोरा पालिका प्रशासनाकडून मोबदला देण्यासाठी दिरंगाई का होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत असून, यात मोठा घोळ झाला असल्याची चर्चा पाचोरा शहरात सुरू आहे.
कोरोना काळातील अंत्यसंस्कार
पाचोरा न.पा.च्या मृत्यू रेकॉर्ड नोंदीनुसार सन २०२०मध्ये-
एप्रिल-२५,
मे-३५
जून-२७
जुलै-५४
ऑगस्ट-८१
सप्टेंबर-७८
एकूण-३००
सन २०२१चे
फेब्रुवारी-३४
मार्च-१२४
एप्रिल-२९३
मे-१२९
जून-३४
जुलै-३४
एकूण ६४८ मृत्यू झाल्याची नोंद आहे.
पाचोरा पालिकेकडून येथील स्मशानभूमी व कब्रस्थानला लाकूड मोफत पुरविले जाते. त्याचा वेगळा ठेका आहे.