लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनानंतर प्रतिकारक्षमता खालावल्याने विविध आजारांचा समाना अनेक रुग्णांना करावा लागत आहे. त्यात कोरोनाच्या औषधींमुळे अनेक वेळा किडनीचे नुकसानही होऊ शकते, त्यामुळे या लक्षणांवर लक्ष ठेवावे, शिवाय ज्यांना किडनीचे विकार आहेत त्यांनी अशा महामारीच्या कालावधीत अधिक खबरदारी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
जिल्ह्यात झालेल्या मृत्यूमध्ये अन्य व्याधी असलेल्यांची संख्या ही पहिल्या लाटेत अधिक होती. दुसऱ्या लाटेत मात्र, वेगळे चित्र समोर आले आहेत.
मात्र, अन्य व्याधी असलेल्यांना कोरोनाचा धोका अधिक असतो, हे तज्ज्ञ वारंवार सांगत आले. तरीही कोरोना झाला म्हणून घाबरून न जाता योग्य उपचार घेऊन तुम्ही कोरोनावर मात करू शकतात, असे अनेक उदाहरणेही समोर आले आहे. त्यामुळे जे काही उपचार घ्यायचे आहेत ते सर्व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या, असे किडनीविकारतज्ज्ञ डॉ. अमित भंगाळे यांनी सांगितले आहे.
हे करा
: किडनीविकार असलेल्यांनी शाकाहरी आहार ठेवावा, यात दूध, दही घेऊ शकतात.
: सर्व प्रकारचे धान्य या आजारात चालते. डाळींचा वापर आहारात करू शकतात. किडनी विकार असलेल्यांनी अधिक दक्षतेने नियम पाळणे गरजेचे आहे. मास्क, स्वच्छता आणि अंतर या गोष्टींचे पालन करा.
हे करू नका
मांसाहार टाळावा. केळी, नारळ पाणी यांचे सेवन टाळावे.
वेदनाशमक औषधी घेणे टाळावे. परस्पर कुठलीही औषधी घेऊ नका. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच उपचार करा.
स्टेराॅइडबाबत काळजी हवी
स्टेराॅइड हे कोणाला द्यावे, कोणाला देऊ नये, हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ठरवले गेले पाहिजे. अन्य एका रुग्णाने ते घेतले म्हणजे आपल्यालाही ते लागू होईल, या गैरसमजातून कोणतेही औषधोपचार परस्पर करू नये, यामुळे रुग्णाच्या जिवालाही धोका होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच स्टेराॅइडचा वापर करावा, असे डॉ. भंगाळे यांनी सांगितले.
किडनीचा रुग्ण बाधित झाल्यास...
किडनीविकारात आधीच रुग्णाची प्रतिकारक्षमता खालावलेली असते. त्यामुळे अशा रुग्णांना कोरोना होण्याचा धोका अधिक असतो. अशा रुग्णांनी कोरोना झाल्यावर घाबरून न जाता, ज्या डॉक्टरांकडे आपण उपचार घेतो त्यांनी याची कल्पना द्यावी, पाणी व लघवीचे प्रमाण वारंवार तपासावे,
किडनीविकारामागे मधुमेह, रक्तदाब अशी कारणे असू शकतात, त्यामुळे अशा रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी, कोरोनामुळे किडनीच्या कार्यावर थेट परिणाम होऊ शकतो.
कोरोना काळात औषधांबाबत अधिक दक्षता घ्यावी लागते, सरसकट अशा रुग्णांना रेमडेसिविर हे इंजेक्शन देता येत नाही.
कोरोनाचे एकूण रुग्ण : १४१५२२
बरे झालेले रुग्ण : १३७०३९
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : १९२१
एकूण मृत्यू २५६२
दुसऱ्या लाटेतील मृत्यू ११९५
कोट
कोराेनामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो, शिवाय ज्यांना किडनीचे विकार आहे. त्यांच्यावर अधिक परिणाम होऊ शकतो. कोरोनाच्या नियमित उपचारांमध्ये डॉक्टरांना कल्पना देऊनच त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत, शाकाहारी आहार ठेवावा, वेदनाशमन औषधी घेऊ नये.
- डॉ. अमित भंगाळे, किडनीविकारतज्ज्ञ