जळगाव : कोरोनाच्या महामारीमुळे आपल्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.या मागणीसाठी राज्यभर सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र जळगावात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.कोविडच्या महामारीमुळे राज्यासह जळगाव जिल्ह्यातील सर्व स्कूल बस विद्यार्थी वाहतूक चालक मालक यांचे उपासमारीच्या संकटाने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे हैराण झालेल्या संघटनेने शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. आजपर्यंत आर्थिक सहाय्य करण्याचे गरजेचे असताना शासनाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचे संघटनेने म्हटले आहे.मार्च महिन्यापासून स्कूल बसेस इतर वाहने बंद असून स्कूल बस सुरु होईपर्यंत दरमहा १० हजार रुपये अनुदान मिळावे, आरटीओ टॅक्स, विमा, प्रोफेशनल कर, फिटनेस व पासिंग १ वर्षासाठी माफ करण्यात यावे, कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ मिळावी व त्यावरील व्याज माफ करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.यावेळी आमदार सुरेश भोळे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, प्रल्हाद सोनवणे, शालेय विद्यार्थी वाहतूक संघटना अध्यक्ष बापू कुमावत, श्रमजीवी कामगार रिक्षाचालक फेडरेशन प्रदेशाध्यक्ष अॅड. गोविंद तिवारी, नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन उपाध्यक्ष प्रमोद वाणी, स्कूल बस असोसिएशन अध्यक्ष भरत वाघ, शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनेचे संजय पाटील आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे चालक मालक विद्यार्थी वाहतूकदारांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 1:07 PM