लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : परराज्यातील रेल्वे गाड्यांमधून उतरणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यासाठी मनपा आरोग्य विभाग व रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेशनवरील मुख्य दादऱ्यावर आरोग्य पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक प्रवाशांना थांबवून प्रत्येकाचे थर्मल गणद्वारे शरीराचे तापमान तपासण्यासह त्यांचे नाव, पत्ता व मोबाइल नोंदवित प्रवाशांना बाहेर सोडत आहे; मात्र दुसऱ्या बाजूच्या दादऱ्यावर तपासणीसाठी कुठलेही पथक नसल्यामुळे अनेक प्रवासी तपासणीविनाच बाहेर पडत आहे. संबंधित यंत्रणेने या प्रकाराकडे सपशेल कानाडोळा केला आहे. मनपा आरोग्य विभागाने कर्मचारी नसल्यामुळे मुख्य दादऱ्यावरच पथक असल्याचे सांगत हात झटकले आहेत.
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून राज्य शासनाने दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक, पश्चिम बंगाल व केरळ या राज्यातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची अँटिजन चाचणी करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. त्यानुसार जळगाव रेल्वे स्टेशनवर मनपा व रेल्वे विभाग मिळून स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक २४ तास या ठिकाणी कार्यरत असून, परराज्यातून येणाऱ्या गाड्यांमधील प्रत्येक प्रवाशांची तपासणी व त्या प्रवाशांचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर आदी नोंदी घेत आहे.
स्टेशनवरील मुख्य दादऱ्यावर हे पथक तैनात असून, गाडी आल्यानंतर आरोग्य विभागाची पंधरा ते वीस मिनिटे ही प्रक्रिया सुरू असते. दररोज १०० ते १५० प्रवाशांची अशा प्रकारे तपासणी करण्यात येत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले; मात्र लॅटफार्म क्रमांक १,२ ला जोडून असलेल्या नवीन दुसऱ्या दादऱ्यावरून तपासणीसाठी कुठलेही पथक नसल्यामुळे हजारो प्रवासी विना तपासणीचेच बाहेर पडत असल्याचे 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले. त्यामुळे मुख्य दादऱ्यावरील तपासणी पथकाचा उपयोग काय? असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे, तसेच रेल्वे व मनपाच्या या चुकीच्या नियोजनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
इन्फो :
रेल्वे प्रशासन म्हणते, आरोग्य पथक नियुक्त करण्याची जबाबदारी मनपाची
मुख्य दादऱ्यावर आरोग्य पथक असताना, रेल्वेने एक ते दीड महिन्यांपासून नवीन दादराही प्रवाशांसाठी खुला केला आहे. त्यामुळे अनेक प्रवासी मुख्य दादऱ्यावरून न जाता विना तपासणीच नव्या दादऱ्यावरून बाहेर पडत आहेत. याबाबत `लोकमत`प्रतिनिधीने स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी तत्कालीन डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या सुचनेनुसार दादऱ्याचे काम पूर्ण झाल्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी हा दादरा खुला केला आहे. तो बंद करता येणार आहे; मात्र या नवीन दादऱ्यावरही आरोग्य पथक नियुक्त करण्याची जबाबदारी मनपाची आहे. तर याबाबत मनपाला पत्र देणार असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
सध्या मनपा आरोग्य विभागातर्फे मुख्य दादऱ्यावर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी आरोग्य पथक नियुक्त केले आहे. कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे, आहे त्या कर्मचाऱ्यांवर ताण आहे; मात्र लवकरच या दादऱ्यावरही पथक नियुक्त केले जाईल.
डॉ. राम रावलानी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.