लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे संपूर्ण जीवनमानावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. अशा संकटकाळात अनेक सामाजिक संस्था व व्यक्ती समाजासाठी पुढे येत असताना दुसरीकडे मात्र या संकटकाळात काही पॅथॉलॉजी चालकांनी चाचण्यांचा बाजार मांडला असून नागरिकांची अक्षरशः लूट सुरू केली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लोकमत टीमने शहरातील काही पॅथॉलॉजीमध्ये जाऊन विविध चाचण्यांच्या दराबाबत माहिती घेतली असता, प्रत्येक पॅथॉलॉजीमध्ये प्रत्येक चाचणीचे वेगवेगळे दर आढळून आले. तसेच कोणत्याही पॅथॉलॉजीमध्ये शासनाने निश्चित करून दिलेल्या दराची अंमलबजावणी होताना दिसून आली नाही. विशेष म्हणजे शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षाही दुप्पट दराने चाचण्या होत असल्याचे आढळून आले.
एजंटांची टक्केवारी वेगळीच
१. विविध पॅथॉलॉजीमध्ये चाचणीचे दर तर वेगळेच आहेत. त्यात काही एजंटदेखील यामध्ये सक्रिय असल्याची माहिती पॅथॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
२. काही रुग्णांना चाचणी करण्यासाठी रुग्णालय परिसरात किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कोरोना चाचणी तपासणी केंद्रावरच काही एजंट सक्रिय असतात. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या टेस्ट करण्यासाठी विविध पॅथॉलॉजीची नावे दिली जातात. संबंधित रुग्णाने पॅथॉलॉजीत तपासणी केली तर त्या एजंटला चाचणी केल्यानंतर मिळालेली काही रक्कम दिली जाते.
३. या प्रकरणात काही वैद्यकीय कर्मचारी देखील एजंट म्हणून काम करत असल्याचीही माहिती देखील पॅथॉलॉजीमध्ये काम करणाऱ्यांनी दिली आहे.
यांच्यावर नियंत्रण कुणाचे
- विविध रक्ताच्या चाचण्याबाबत पॅथॉलॉजी असोसिएशनने निश्चित केलेल्या दरानुसार तपासणी केली जाते.
- तर जिल्हा प्रशासनाने ॲन्टिजन टेस्टसाठी १५० तर आर.टी.पी.सी.आर साठी ५०० रुपये निश्चित केले आहेत. मात्र या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम रुग्णांकडून आकारली जात आहे.
-यावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण असले तरी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
चाचण्या आणि दर
चाचण्या - लॅब १ - लॅब २- लॅब ३
ॲन्टिजन - ३५० - ३०० - ३००
आर.टी.पी.सी.आर. - ८०० - ९०० - ८५०
सीबीसी - २०० - २५० - २००
सीआरपी - ३५० - ४००- ३५०
डी. डायमर - १५०० - १७०० - १८००
एल.एफ.टी. - ७०० - ६५० - ७००
के.एफ.टी.- ४००- ४५० - ४५०