लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आई-वडिलांचे छत्र कोरोनाने हिरावुन नेले. आता जिल्हास्तरीय महिला व बालकल्याण विभाग आणि जिल्हास्तरीय कृती दल या मुलांवर मायेची पाखर घालणार आहे. कोरोनाने दोन्ही पालक हिरावलेली आठ बालके असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडे आहे. त्यातील चार जण जळगावचे तर चोपडा आणि सावदा येथील दोन जण असल्याची माहिती आहे. या आठही मुलांशी फोनवरून संपर्क साधून त्यांना मानसिक धीर दिला जात आहे. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या मदतीचे प्रस्ताव तयार केले जाणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनामुळे आई-वडिलांना गमावलेल्या मुलांची माहिती सध्या जिल्हा महिला व बाल कल्याण विभाग संकलीत करीत आहेत. त्यातून या आठ मुलांची नावे विभागाकडे आली. या मुला-मुलींचे संगोपन योग्य प्रकारे व्हावे, त्यांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात. यासाठी तालुका महिला व बालविकास अधिकारी, गटविकास अधिकारी प्रयत्न करणार आहेत. तसेच त्यांच्या मदतीचे प्रस्ताव तयार केले जातील.
अनाथ झालेल्या बालकांची माहिती द्यावी
कोरोनामुळे पालक गमावेलल्यांची माहिती सामाजिक संस्था, नागरिकांना अधिक असते. अशी बालके असल्यास त्यांची माहिती जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, तसेच चाईल्ड लाईनला द्यावी, असे आवाहन परदेशी यांनी केले आहे. त्यासोबतच जिल्हा कार्यालय सध्या कोरोनाने एक पालक गमावलेल्या मुलांचा देखील शोध घेत आहे. कोरोनाच्या काळात कुणी आई गमावली तर कुणी वडील. त्यांना मानसिक आधार तसेच इतर आवश्यक मदत देण्यासाठी एक पालक गमावलेल्या मुलांचा शोध देखील घेतला जात आहे. ६ वर्षा आतील बालकांकडे विशेष लक्ष असल्याची माहिती देखील विजयसिंग परदेशी यांनी दिली.