- स्टार : 726
जिल्ह्यात दोन वर्षात उष्माघाताचे बळी नाही : संचारबंदीमुळे नागरिक घरातच
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मार्च २०२० मध्ये भारतात कोरोनाचे रुग्ण सुरु झाले. त्यानंतर २२ मार्च पासून देशभरात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे सर्वच जण घरात थांबून आहेत. आता पुन्हा एकदा एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्याने या दोन वर्षात उष्माघाताच्या एकाही बळींची नोंद जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे झालेली नाही.
गेल्या १४ ते १५ महिन्यांपासून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन कोरोनाशी लढा देत आहे. तसेच लॉकडाऊन असल्याने नागरिक घरातच आहेत. कुणीही बाहेर फिरु शकत नसल्याने जळगाव जिल्ह्यातील उष्माघाताच्या रुग्णांची संख्या एकदम कमी झाली आहे. नागरिक घराबाहेर निघाले तर बहुतेक ठिकाणी त्यांच्यावर कारवाईसाठी पोलीस उभे असतात. त्यामुळे सर्वच जण घरीच आहेत. उन्हात कुणीही भटकत नसल्याने चांगला परिणाम असा झाला की गेल्या २०२० च्या उन्हाळ्यात आणि यंदाच्या उन्हाळ्यात देखील उष्माघाताचे फारसे रुग्ण समोर आलेले नाहीत.
तापमानही चाळीसच्या आसपास
दरवर्षी उन्हाळ्यात जळगावचे तापमान चाळीसच्या पुढे असते. यंदा मे महिन्याचा पहिला आठवडा जळगावकरांसाठी काहीसा फायदेशीर ठरला. जळगावला ८ मे रोजी ४० अंश सेल्सीअस तापमान होते. त्या व्यतिरिक्त इतर दिवस तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस एवढेच होते. असे असले तरी एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा मात्र जळगावकरांसाठी त्रासदायकच होता. या आठवड्यात कमाल तापमान हे ४० होते. तर किमान तापमान देखील २५ ते २६ अंशांच्या जवळ होते. यंदा वातावरणात देखील बदल होत असल्याने यंदाचा उन्हाळा फारसा त्रासदायक ठरलेला नाही.
उन्हाळा घरातच
गेल्या दीड महिन्यांपासून राज्यात संचारबंदी आहे. त्यामुळे नागरिक अत्यावश्यक कामे वगळता घरातच आहेत. त्यामुळे यंदा जळगावकरांना उन्हाचे चटके बसलेले नाही.