लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढताच कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ नोंदविली गेली आहे. शनिवारी ७१ नवे बाधित आढळून आले असून दीड महिन्यातील ही मोठी रुग्णवाढ आहे. गंभीर बाब म्हणजे यात ४६ रुग्ण हे जळगाव शहरातील आहेत.
शहरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून विविध भागात रुग्ण आढळले आहेत. यात रायसोनी नगर हे एक नवे हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहेत. तीन दिवसात कोरोनाचे ११ बाधित रुग्ण या ठिकाणी आढळून आले आहेत. शनिवारी जिल्ह्यात आरटीपीसीआरचे ७९२ अहवाल समोर आले. यात २७ तर २४४ ॲन्टीजन चाचण्यांमध्ये ४४ बाधित आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून चाचण्या घटल्याने रुग्णसंख्या नियंत्रणात दिसत होती. मात्र, चाचण्या वाढताच कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या आधी २९ जानेवारी रोजी ८० रुग्ण आढळून आले होते. शनिवारी या दीड महिन्यातील ही सर्वात मोठी रुग्ण आहे.