जळगाव : कोरोना संपलाय असे वातावरण असताना कोरोनाने अचानक उसळी घेतली आहे. मार्चमध्ये तर कहर झाला आहे. गेल्या पाच दिवसात एकट्या जळगाव शहरात १०४५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत एकट्या जळगाव शहरात नियमित सरासरी ५० टक्के रुग्ण आढळून येत आहे. जळगाव शहरातूनच संसर्गाचा विस्फोट होत असल्याचे गंभीर चित्र गेल्या पाच दिवसांपासून आहे.
गेल्या तीन दिवसात कोरोना रुग्णांची उच्चांकी नोंद झाली. शहरात एकाच दिवसात शंभर रुग्णवाढ समोर आली. शहरातील परिस्थिती बघता प्रशासन नेमकी आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही ठरावीक ठिकाणी कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे चित्र असल्याने आता सर्वच कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या आहेत.
मार्च महिना असा
१ मार्च : १४५
२ मार्च : १२४
३ मार्च : १६९
४ मार्च : २४८
५ मार्च : ३६९
शहर हॉटस्पॉट असल्याची पाच मुख्य कारणे
१ शहरात लोकसंख्या अधिक असून बाजारपेठांमधील गर्दी अनियंत्रित आहेत.
२ मास्क परिधान न करणे, किंवा अर्धवट परिधान करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
३ होम आयसोलेशनच्या रुग्णांवर नियंत्रण नसणे
४ प्रलंबित अहवालांची वाढलेली संख्या, आरटीपीसीआर केल्यानंतर संबंधिताला घरी सोडले जाते.
५ लक्षणे असूनही टाळाटाळ करून उशिरा रुग्णालयात जाणे, तोपर्यंत बाहेर फिरणे
स्ट्रेन की म्युटेशन?
कोरोनाचा संसर्ग अगदीच झपाट्याने वाढत असून यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे. सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या अधिक आहे. मात्र, हा स्ट्रेन कोरोना आहे का याबाबत चाचण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे याला स्ट्रेन संबोधता येणार नाही. सद्य:स्थितीत विषाणू हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश केल्यानंतर स्वत:मध्ये जनुकीय बदल करतो, त्यामुळे हे थोडेफार बदल आढळून येत असल्याचे आपण आता म्हणून शकतो, असे औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले.