लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाने अधिक कहर केला असताना, ७० गावांनी कोरोनाला वेशीवरच अडविले आहे. या ७० गावांपैकी चार गावांच्या सरपंचांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी ७ जून रोजी संवाद साधणार आहे. जिल्हा परिषदेच्या या कार्यक्रमाच्या बाबतीत नियोजन सुरू होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विभागनिहाय सरपंचांशी हा संवाद साधणार आहेत. त्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या गावांच्या सरपंचांकडून अनुभव ऐकून घेणार असून, विविध पातळ्यांवर त्यांच्याकडून माहिती घेतली जाणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेला शासनाला गावांची नावे कळवायची असून, याचे नियोजन ग्रामपंचायत विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांच्यासह अधिकारी करीत होते. यानुसार, चार गावांची नावे अंतिम करून ती शासनाला कळविण्यात येणार आहे. सोमवारी त्यांना जळगावात बोलावून त्यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला जाणार आहे. या गावांनी नेमक्या काय उपाययोजना केल्या, कोणते अभियान यशस्वीरीत्या राबविले. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना नेमके कसे लक्ष ठेवले, अशा काही बाबींवर यात चर्चा केली जाणार आहे.
जिल्ह्याची परिस्थिती अशी
एकूण गावे : १,४९९
एकूण ग्रामपंचायती : १,१५७
कोविड रुग्ण आढळलेली गावे १,४३१
कोविड रुग्ण आढळलेल्या ग्रामपंचायत १,०९४
कोविड रुग्ण न आढळलेली गावे : ७०
कोविडमुक्त झालेली गावे १,१७९
यावल तालुका टॉपवर
यावल तालुक्यातील २६ गावांमध्ये पहिल्या व दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. यासह पाचोरा १४, रावेर १२, अमळेनर, भडगाव प्रत्येकी ४, चाळीसगाव, एरंडोल प्रत्येकी ३, जळगाव २ यासह बोदवड व चोपडा तालुक्यातील प्रत्येकी १ - १ ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे.