लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षभरापासून मुलांना मैदानावर जाण्यास बंदी होती. या काळात मुलांनी वेळ घालवण्यास मोबाइलचा वापर सुरू केला. त्यात आता मुले मैदानावर जात नाही. त्या ऐवजी मोबाइलवर आणि प्ले स्टेशनवर गेम खेळणे सुरू केले आहे. हे प्रमाण इतके वाढले आहे की आता त्याचे मुलांना व्यसन लागले आहे.
शहरात कोरोनाच्या आधीच्या काळात शिवतीर्थ मैदान, सागर पार्क, छत्रपती संभाजी राजे मैदान, सावखेडा शिवारातील मैदाने त्यासोबतच ठिकठिकाणच्या शाळा महाविद्यालयांच्या मैदानात सातत्याने गर्दी होत होती. मात्र मार्चपासून नोव्हेंबरपर्यंत मैदाने बंदच होती. त्यानंतर हळूहळू मैदाने खुली करण्यात आली. विविध क्रीडा स्पर्धांना परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी दिल्यापासून काही प्रमाणात परवानगी दिली आहे. मात्र कोरोनाच्या आधी जशी मैदाने गजबजत होती. त्या प्रमाणात आता मुले मैदानांवर येत नाही. जलतरण तर अद्यापही बंदच आहे.
मुले कायम मोबाइलवर
सद्या शाळादेखील ऑनलाइन वर्ग घेत आहेत. त्यामुळे दिवसभरातून मुले पाच ते सहा तास मोबाइल, लॅपटॉप किंवा टॅबलेटवर असतात. त्यानंतर कंटाळल्यावर काय करायचे तर ते मोबाइलवर गेम खेळतात. मोबाइलवर वेगवेगळ्या ॲपमध्ये गेम्स खेळणे, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणे असे प्रकार होत आहेत.
देशी खेळ झाले गायब
शाळा बंदच आहेत. कोरोनाच्या आधीच्या काळात गल्लीत खेळले जाणारे काही देशी खेळ मुले खेळत असायची. मात्र आता घराबाहेर पडणेदेखील कठीण झालेले असल्याने विटी-दांडू, गोट्या, लंगडी, मल्लखांब, कबड्डी या सारखे देशी खेळ जणू गायबच झाले आहे. त्यातल्या त्यात खो-खो, कबड्डी या सारख्या खेळांना मान्यता असल्याने त्यांचे सराव तरी काही प्रमाणात होतात. मात्र इतर खेळांना कुणीही विचारत नाही.
कोरोनाने वाढले मोबाइल गेम्स खेळण्याचे प्रमाण
कोरोनाच्या काळात इनडोअर आणि ऑनलाइन गेम्स खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. बुद्धिबळ ऑनलाइन खेळता येते. त्यातच कॅरम खेळण्यासाठीही काही ॲप आता उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. बहुतेक मुलांना लठ्ठपणा आणि डोळ्यांच्या विकारांचा सामना करावा लागत आहे. त्यात काही मुले आहेत जी मोबाईलच्या बाहेर पडून काही खेळ खेळण्याचा प्रयत्न करतात.
७० टक्के इनडोअर गेम्स
३० टक्के आऊटडोअर गेम्स
कोट -
सद्या बहुतांश मुले मोबाइलवरच गेम्स खेळत आहेत. याचे प्रमाण जास्त वाढले आहे. त्यामुळे पालकांनीच आता मुलांना घराबाहेर पाठवण्याची गरज निर्माण झाली आहे. मुले घराबाहेर आली तरच त्यांचा विकास होईल. मात्र कोरोनाचे संकट कायम आहे. - प्रवीण पाटील
मुले मोबाइलमध्येच गुरफटून पडली आहे. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत आहे. मुलांना बाहेर खेळायला पाठवणे गरजेचे आहे. मात्र कोरोनामुळे मुलांना बाहेर पाठवणेदेखील धोक्याचे झाले आहे. मुलांनी घरीच शारीरिक पण इनडोअर खेळ खेळावेत. - अक्षय सोनवणे