लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची लागण झाल्यानंतरही अनेकांना लक्षणेही दिसत नाहीत, अशी व्यक्ती ही सर्वाधिक धोकादायक असते. या व्यक्तींमुळे कोरोनाचा अधिक संसर्ग होऊन याचा फटका कधीही घराबाहेर न पडणाऱ्या ज्येष्ठांना होत आहे. अशी अनेक उदाहरणे जिल्ह्यातही समोर येत असून अनेक जण तर कधीही घराबोहर न पडताही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तसेच एकत्रित चित्र बघता कोरोनात गंभीर होण्याचे प्रमाण हे तरुणांपेक्षा ज्येष्ठांचे अधिक आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा फैलाव अतिशय वेगाने होत आहे. पहिल्या लाटेत एक व्यक्ती बाधित आल्यानंतर शक्यतोवर कुटुंबीयांना लागण झालेली नसायची. मात्र, यंदाच्या या दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंबांना एकत्रित लागण हाेत असल्याचे गंभीर चित्र आहे. गेल्या चार महिन्यात तरुणांमध्येही लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. यात लहान मुलांचा समावेश आहे. मात्र, नियमित बाहेर ये-जा करणाऱ्यांपासून कुटुंबात कोरोनाचा धोका वाढत असल्याची अनेक उदाहरणे आता समोर येत आहेत. दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाणही अधिकच वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयेही फुल्ल झाले आहे.
ही आहेत उदाहरणे
डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ज्येष्ठ तपासणीनंतर बाधित येतात, त्यांना विचारल्यानंतर समोर येते कर ते कधीच घराबाहेर पडलेले नाहीत, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली. काही जण तर यामुळे चाचण्यांवर प्रश्नचिन्ह करतात, मात्र त्यांना कोरोना झालाय हे ते स्वीकारत नाहीत.
एका महिलेला दम्याचा त्रास होता. तीन महिन्यांपासून त्या घराबाहेत पडल्या नव्हत्या मात्र, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले होते.
काही तरुणांची त्यांच्या संपर्कातील कोणीतरी बाधित आल्यानंतर तपासणी केल्यानंतर तरुणही बाधित येतात, मात्र कधी कधी अशा तरुणांना लक्षणे नसतात, हेच तरुण अधिक धोकादायक ठरू शकतात.
काय काळजी घ्यावी...
१. बाहेर जाणाऱ्यांनी, तरुणांनी बाहेर जायचे असल्यास स्वत: मास्क परिधान करावे. गर्दीत जावू नये. हात नाकातोंडाला लावू नये.
२. बाहेरून आल्यानंतर आपले कपडे, साहित्य हे घरातील अन्य मंडळींच्या साहित्यापासून व त्यांच्यापासून लांब ठेवावे.
३. घरात जाण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुऊनच कोणत्याही वस्तूला स्पर्श करावा.
४. आपल्याला थोडीही लक्षणे जाणवल्यास तातडीने विलग होऊन तपासणी करून घ्यावी.
५. घरात कोणालाही लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीने विलग होऊन तपासणी करून घ्यावी.
चार महिन्यातील चित्र
शून्य ते २० वर्षापर्यंतचे बाधित ९८८
२० वर्षांवरील बाधित ३६,५६६
एकूण मृत्यू १,८०९
५० वर्षे किंवा त्या वर्षावरील रुग्णांचे मृत्यू : १,४९३
५० वर्षांखालील मृत्यू ३१६