लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता पालक चिंतेत पडले आहेत. आधीच जळगाव जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. जर कोरोना असाच वाढत राहिला तर विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा कशी घेणार आणि त्यावेळी नियम कसे पाळणार, असा प्रश्न पालकांच्या मनात उपस्थित होत आहे. मात्र आता त्याचे उत्तर प्रशासन कसे देणार?
जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद करण्यात आली आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्ण वाढत होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सुरू असलेली शाळा आणि महाविद्यालये बंद केली. आता विद्यापीठदेखील ६ मार्चपर्यंतच्या परीक्षा ऑनलाईन घेणार आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
आकडेवारी
दहावी - ५९ हजार
बारावी - ४५ हजार
कोट -
दहावीच्या मुलांचे पालक
शिक्षणमंत्र्यांनी अशी घोषणा का केली, हाच प्रश्न आहे. एकीकडे सगळीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. लहान गावांमध्येही पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आमच्या मुलांचा जीव परीक्षेसाठी का धोक्यात टाकला जात आहे. हेच कळत नाही - वैशाली आंबटकर, पालक
कोरोना पुन्हा वाढतोय सध्या आम्ही घराबाहेर जाणे कमी केले आहे किंवा टाळले आहे. असे असताना सरकारला परीक्षा ऑफलाईन का घ्यायची आहे हेच कळत नाही. जशा महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन घेतल्या जात आहेत. तशाच या परीक्षादेखील ऑनलाईन घेण्यात याव्या. - रवींद्र अस्वार
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिक्षण महत्त्वाचे आहेच. पण सध्याच्या परिस्थितीत आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे. ऑफलाईन परीक्षेत उत्तरपत्रिका हाताळणी, प्रश्नपत्रिका हाताळणी यामुळे जर कोरोना आणखीच पसरला तर त्याला जबाबदार कोण असेल. - वाल्मीक पाटील
बारावीचे पालक
कोरोना वाढतोय, मात्र तरीही सरकारला अद्याप ऑफलाईन परीक्षाच का घ्यायची, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आधीच कोरोना परीक्षा घेतोय आता त्यात सरकारला का मुलांची परीक्षा घ्यायची आहे - अरुण पाटील
सरकारने ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या आधी कोरोनावर नियंत्रण ठेवावे. हीच प्राथमिकता आहे. परीक्षा ऑनलाईनसुद्धा होऊ शकते. महाविद्यालयांमध्ये सध्या ऑनलाईन परीक्षाच होत आहेत. तेथे ऑफलाईन नाही. मग दहावी आणि बारावीच्या मुलांनाच का बोलावले जात आहे. : संदेश नेवे
कोरोनाच्या काळात सरकारला मुलांना परीक्षेला का बोलावायचे आहे, ते कळत नाही. परीक्षेच्या माध्यमातून आणखी संसर्ग वाढला तर ती परिस्थिती कशी सांभाळली जाणार? - सुरेश चौधरी