जळगाव आगार : डिजिटल बोर्ड बसविण्याचे कामही बाकी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेल्वेप्रमाणे एसटी बसचेही लाइव्ह लोकेशन समजण्यासाठी महामंडळातर्फे गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यातील सर्व बसेसला जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, कोरोनामुळे गेल्यावर्षी सहा महिने सेवा बंद असल्याने या कामावर परिणाम होऊन, संथ गतीने हे कामकाज सुरू आहे. त्यामुळे दीड वर्ष उलटत असतानाही महामंडळातर्फे ‘लाइव्ह लोकेशन’ची यंत्रणा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
गावी जाताना बऱ्याचदा प्रवाशांना गाडीची वाट पाहत स्थानकातच ताटकळत बसावे लागते. संबंधित गावाला जाण्यासाठी नेमकी बस केव्हा आहे, हे समजण्यासाठी आगारात जाऊन चौकशी करावी लागते. यामध्ये प्रवाशांचा वेळही वाया जातो. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांचा हा त्रास दूर व्हावा आणि प्रवाशांना रेल्वेप्रमाणे कुठल्याही गावाला जाण्यासाठी किती वाजता बस आहे, हे समजण्यासाठी महामंडळाने ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम’ सुरू केली आहे. या सिस्टीमनुसार जळगाव विभागातून विविध मार्गांवर धावणाऱ्या बसेसचा ‘रूट मॅप’ तयार करण्यात आले असून, अनेक बसेसला जीपीएस यंत्रणाही बसविण्यात आली आहे. मात्र, बसस्थानकात व आगारात डिजिटल बोर्ड बसविणे, ॲप तयार करणे इत्यादी तांत्रिक कामे मात्र रखडली आहेत. कोरोनामुळे हे काम बाकी असल्याने, बसच्या लाइव्ह लोकेशन प्रक्रियेला विलंब होत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
एम्फो :
तर यंत्रणा सुरू होण्यासाठी चार महिने लागणार
महामंडळाने जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेतल्यानंतर वर्षभरातच हे काम पूर्ण झाले असते. मात्र, कोरोनामुळे गेल्यावर्षी सहा ते सात महिने एसटी महामंडळाची सेवा पूर्णतः बंद होती. सेवा बंद असल्याने हे कामही बंद होते. सेवा सुरू झाल्यानंतर सद्य:स्थितीला बहुतांश बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, आगारांमध्ये व थांब्यांवर डिजिटल बोर्ड बसविणे व ॲप तयार करण्याचे काम बाकी आहे. ही सर्व यंत्रणा तयार झाल्यानंतर चाचणी घेण्यात येईल, ही चाचणी यशस्वी झाल्यावर महामंडळातर्फे एसटी बसेसची लाइव्ह लोकेशनची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.