लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : २०२० मध्ये प्रथमच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे केवळ कोविड रुग्णासाठीच्या उपचारासाठी काेविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याचा थेट परिणाम अन्य आजारांच्या व अन्य उपचारांवर पडला आहे. दरवर्षी या रुग्णालयात होणाऱ्या प्रसुतींची संख्या घटली असून या ठिकाणी मध्यंतरीच्या काळात केवळ कोविड बाधित व संशयित मातांनीच बालकांना जन्म दिला. शिवाय जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेतही गेल्या वर्षीची संख्या कमी नोंदविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोविड केअर सेंटर किंवा कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले होते. त्याचा परिणाम अन्य आजारांच्या उपचारांवर झाला होता. गर्भवती महिलांना मध्यंतरी कोरोना टेस्ट केल्याशिवाय दाखल केले जात नव्हते. बहुतांश महिलांना कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्यांना कोविड रुग्णालयातच दाखल करण्यात येत होते. शिवाय अशा महिलांच्या प्रसुतीसाठी केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातच व्यवस्था होती. अन्य कुठल्याची ठिकाणी अशी व्यवस्था नव्हती.
२०२० नॉन कोविड
जानेवारी : १६५
फेब्रुवारी : १३१
मार्च १४५
डिसेंबर : ४८
२०२० कोविड
एप्रिल ते डिसेंबर : बाधित : ६३
संशयित : १८
पुन्हा कोविड रुग्णालय
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे पुन्हा एकदा कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी कोविड संशयित व कोविड बाधित रुग्णांवरच उपचार केले जात आहेत. विशेष बाब म्हणजे गर्भवती महिलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत असून त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी बेड राखीव ठेवण्यात आला आहे. बालकांसाठीही नवजात शिशू काळजी कक्ष विभागात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी काही संशयित व काही बाधित बालके दाखल आहेत. बालकांसाठीच्या कक्षातही बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.
शहरात अन्य व्यवस्थाच नव्हती
कोविडचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर व शिवाय मनुष्यबळाचा विषय असल्याने शहरातील मनपा रुग्णालयात प्रसुती बंदच होत्या. शाहू महाराज रुग्णालयही गेल्या वर्षी क्वारंटाईन सेंटर असल्याने या ठिकाणच्या अन्य सेवा बंद करण्यात आल्या हेात्या. त्यामुळे शहरात जीएमसी वगळता कुठेही शासकीय पातळीवर व्यवस्था नव्हती. त्यामुळे सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला हेाता.