जळगाव : कोरोनाबाधित एका ४२ वर्षीय प्रौढाच्या मृत्यूची नोंद शनिवारी शासकीय अहवालात करण्यात आली आहे. ते जळगाव शहरातील रहिवासी असून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल होते. दरम्यान, त्यांचा मृत्यू शुक्रवारीच झाला मात्र, नोंद शनिवारी करण्यात आली आहे. त्यांना यकृताचा विकार असल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती, अशी माहिती मिळाली.
शनिवारी जिल्ह्यात ५२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून यात जळगाव शहरातील १४ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, ५० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या स्थीर आहे.
कमी वय मात्र अन्य व्याधी धोकादायक
गेल्या काही दिवसांपासून बाधितांच्या मृत्यूची संख्या वाढत असून शनिवारी ५० वर्षाखालील रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने काहीसे चिंतेचे वातावरण होते. मात्र, त्यांना काही दिवसांपूर्वी गंभीरावस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कमी वय असले तरी अन्य व्याधी असलेल्यांना कोरोनाचा अधिक धोका असतो, असे स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिले आहे.
४१९ अहवाल प्रलंबित
जिल्ह्यात शनिवारी ॲन्टीजनच्या ५९० चाचण्या झाल्या यात २६ बाधित आढळून आले आहेत तर आरटीपीसीआरचे ४६३ अहवाल समोर आले. यात २६ बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, अद्याप ४१९ अहवाल प्रलंबित आहे. व्यापारी, दुकानदारांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आल्याने हे अहवाल प्रलंबित राहत असल्याची माहिती आहे.