लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात रविवारी कोरोनामुळे तीन बाधितांच्या मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यात शहरातील एका ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान, नवे ३१ रुग्ण समोर आले यात जळगाव शहरात १० रुग्ण आढळून आले आहेत.
रविवारी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले. ॲन्टीजन ३४० तर आरटीपीसीआरचे ८३३ अहवाल समोर आले. यात अनुक्रमे २० आणि ११ रुग्ण समोर आले. तर आरटीपीसीआरच्या ७९४ चाचण्या करण्यात आल्या. २९४ अहवाल अद्याप प्रलंबित असून येत्या एक दोन दिवसात ते स्पष्ट होतील. दरम्यान, जळगाव शहरासह भुसावळ येथील ६५ वर्षीय पुरूष आणि रावेर तालुक्यातील ७७ वर्षीय पुरूष यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मृतांची संख्या १३४४ झाली असून हे तिघेही मृत्यू खासगी रुग्णालयात झालेले आहेत.
असे आढळले रुग्ण
जळगाव ११, भुसावळ १, अमळनेर २, चोपडा ३, धरणगाव २, एरंडोल ४, जामनेर १, चाळीसगाव ७ तर अन्य तालुक्यांमध्ये एकही रुग्ण समोर आलेला नाही. जळगाव शहरातील बीबा नगर, महेंद्र नगर, रामानंद या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.