जळगाव : शनिवारी शून्यावर गेलेल्या जळगाव शहरात रविवारी एक कोरोना रुग्ण आढळून आला. आरटीपीसीआर चाचणीत हा रुग्ण समोर आला आहे. यासह चोपडा तालुक्यात एक रुग्ण आढळून आला असून, जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ वर पोहोचली आहे.
शनिवारी शहरातील एकमेव रुग्ण बरा झाल्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर पोहोचली होती. दोन्ही लाटांमध्ये असे प्रथमच घडले होते. सलग २८ दिवस हे सकारात्मक चित्र राहिल्यास शहर कोरोनामुक्ती होणार होते. मात्र, रविवारीच रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९८४ अहवाल समोर आले, तर ॲन्टिजनच्या ११४१ चाचण्या झाल्या. यात दोन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सक्रिय रुग्णांमधील हे दोन नवीन रुग्ण लक्षणे नसलेले असून, गृहविलगीकरणातच उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आता जळगाव शहर, भुसावळ, अमळनेर, चोपडा, धरणगाव, चाळीसगाव या तालुक्यांत प्रत्येकी १ रुग्ण आहे.