जळगाव : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सोमवार दि.२३ मार्चपासून जिल्ह्यातील सर्वच आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी शनिवारी रात्री काढले आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. जे व्यावसायिक आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्याविरुध्द कलम १८८ नुसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.नव्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, धाबे, रिसॉर्ट, फार्म हाऊस, रेस्टॉरंट, खानावळी, आईसस्क्रीम पार्लर, सर्व प्रकारच्या शीत पेयांचे गाडे, दुकाने (लिंबू, सोडा, सरबत, बर्फाचे गोळे,आईसकॅँडी, उसाचे रस, इ.तत्सम सर्व), सर्व प्रकारचे सोने, चांदी दुकाने, कापड, आॅटोमोबाईल, भाड्यांची दुकाने, इलेक्ट्रीकल्स व इलेक्ट्रीक, टिंबर, हार्डवेअर, प्लायवूड, झेरॉक्स दुकाने, फोटो स्टुडीओ, लॉटरी सेंटर, मोबाईल रिपेअरींग व विक्री, सलून, ब्युटी पार्लर, फटाके, गॅरेज, स्वीट मार्ट, व्हिडीओ गेम्स, सायबर कॅफे, व्हिडीओ पार्लर, साहसी खेळांचे ठिकाण, वॉटर पार्क, कला केंद्र व खेळाचे केंद्रे व क्लब हे २३ मार्चपासून पुढील आदेश होईपर्यंत बंद राहतील.यांना हा आदेश लागू नाहीजिवनाश्यक वस्तू, किराणा दुकान, औषधालये, फळे, भाजीपाला, दूध विक्री दुकाने, अत्यावश्यक सेवा व सेवेतील व्यक्ती, दवाखाने, पॅथॉलाजी लॅबोरेटरी, अंत्यविधी (गर्दी टाळून) व प्रसारमाध्यमे आदींना हा आदेश लागू नाही.
कोरोना : उद्यापासून जळगाव जिल्हा लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 1:01 PM