जळगाव : शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा विभागप्रमुख हेमंत विजय महाजन (४५, रा. महाबळ) यांचे गेल्या आठवड्यात कोरोनाने निधन झाले. त्यानंतर, आता त्यांचे वडील विजय चिंतामण महाजन (रा. महाबळ) यांचेही बुधवारी पहाटे २ वाजता निधन झाले. विजय महाजन यांच्या मृत्यूच्या आधी त्यांच्याच कुटुंबातील सदस्य तथा मावशी विद्या गायकवाड यांचेही निधन झाले होते. दहा दिवसांत एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
दरम्यान, लहान भाऊ अमित महाजन व पत्नी या दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. कुटुंबातील पाचही जण कोरोनाबाधित झाले. त्यापैकी तिघांचा बळी गेला. भाऊ अमित व त्याची पत्नी असे दोघे जण बरे होऊन घरी परतले. हेमंत महाजन अविवाहित होते. हेमंत त्यांच्या पश्चात आई हेमलता, भाऊ अमित व त्याची पत्नी सोनाली, भावाची मुले सोहम व मृण्मयी असा परिवार आहे. अमित यांचा महाबळ रस्त्यावरील जाणता राजा प्रतिष्ठानच्या बाहेर दुधाचा स्टाॅल आहे.
संकटात मित्रपरिवार धावला
हेमंत महाजन यांच्या कुटुंबात पाचही जण कोरोनाबाधित झाल्याने आम्रपाली मित्र मंडळ तसेच चंद्रकांत कंखरे, हरगोपाल गांधी, डॉ. पंकज गुजर व सचिन मुंदडा आदी मित्र मंडळींनी २० दिवसांपासून महाजन कुटुंबाच्या मदतीसाठी स्वतःला झोकून दिले. अगदी जेवणापासून तर अंत्यविधीपर्यंत संपूर्ण जबाबदारी याच मित्रांनी उचलली. माजी महापौर नितीन लढ्ढा व शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे सतत उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात होते. दहा दिवसांत तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याने मोठा आघात या कुटुंबावर झालेला आहे. भाऊ अमित व त्यांची पत्नी सोनाली असे दोघेही क्वारंटाइन आहेत. त्यामुळे अमित यांना भाऊ हेमंत व वडिलांच्या निधनाची माहिती देणे टाळले होते. दुपारी १२ वाजता अमितच्या वडिलांवर नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.