लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाने सध्या सर्वत्र थैमान माजवले आहे. रोजचा आकडा हजाराच्या घरात आहे, तर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही दहाच्या घरात आहे. त्यातल्या त्यात धसक्याने एकाच कुटुंबात सलग मृत्यूच्या घटना घडत असल्याने चिंता अधिकच वाढत चालली आहे. शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा विभागप्रमुख हेमंत विजय महाजन (वय ४५, रा. महाबळ) यांचे दोन दिवसांपूर्वीच कोरोनाने निधन झाले. त्याआधी दोन दिवसअगोदरच त्यांच्याच कुटुंबात वास्तव्याला असलेल्या मावशीचे कोरोनाने निधन झाले. महाजन यांच्या कुटुंबातील दोघांच्या निधनाने महाबळ परिसरात शोककळा पसरली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत महाजन हे मूळचे नागपूरचे. वडील विजय महाजन राष्ट्रीयीकृत बँकेत व्यवस्थापक असल्याने त्यांची जळगावात बदली झाली. हेमंत महाजन यांनी आइस्क्रीम पार्लरचा व्यवसाय सुरू केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी ते सुरुवातीपासूनच प्रभावित होते, त्यामुळे त्यांनी जळगाव शहरात शिवसेनेचे कार्य सुरू केले. माजी महापौर किशोर पाटील यांच्या संपर्कात आल्याने काही दिवसांतच त्यांनी स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले. सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची शिवसेनेच्या विभागप्रमुख म्हणून निवड झाली. महाजन हे पत्नी, वडील, आई व मावशीसह महाबळमध्ये वास्तव्याला होते.
सुरुवातीपासूनच मावशी महाजन यांच्याकडे वास्तव्याला होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाचे निदान झाले. उपचार सुरू असतानाच मागील आठवड्यात त्यांचे निधन झाले. अशातच महाजन यांनाही कोरोना असल्याचे निदान झाले. दवाखान्यात उपचार सुरू असतानाच २ एप्रिल रोजी त्यांचेही निधन झाले. एकाच आठवड्यात एकाच कुटुंबात दोघांचे निधन झाले, तर वडील विजय महाजन हे देखील कोरोनाबाधित झाले. मुलाच्या अंत्यसंस्कारालाही त्यांना जाता आले नाही. किंबहुना त्यादिवशी त्यांना मुलांच्या मृत्यूची बातमी कळू दिली नाही. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हेमंत यांनी मावशीलाच आई मानले होते.