लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचा लपंडाव सुरू असल्याचे चित्र आहे. एक रुग्ण बरा होत नाही तोच एक नवीन रुग्ण आढळून येत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या स्थिर राहत आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीकडे जात असलेले अनेक तालुक्यांत पुन्हा कोरोना शिरला आहे. जिल्ह्यात शनिवारी २४ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरात शनिवारी पाच रुग्ण आढळले तर १८ रुग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या १९९ वर आली आहे. यावल तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी एकच सक्रिय रुग्ण होता. हा रुग्णही बरा झाला, नेमका त्याच दिवशी एक दुसरा रुग्ण समोर आला होता. त्यामुळे एक संख्या कायम राहिली त्यानंतर पाच रुग्ण समोर आले. शनिवारी एक रुग्ण बरा झाला व एक नवा रुग्ण सापडल्याने पुन्हा सक्रिय रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. अशीच स्थिती अन्य तालुक्यांमध्ये असल्याने ही संख्या शून्य झालेली नाही.
शहरात तपासण्या अधिक
शहरातील खान्देशमील कॉलनी आणि मोहननगर या भागात प्रत्येकी १ रुग्ण समोर आला आहे. जिल्ह्याच्या तुलनेत शहरात अधिक तपासण्या होत असून आता प्रलंबित अहवालही समोर येत आहे. फुले मार्केटमध्ये झालेल्या तपासणीचे अहवालही समोर आले असून, यात एकही बाधित आढळून आलेला नाही. पहिल्या दिवशीच्या तपासणीत दोन बाधित आढळून आले होते. सोमवारपासून पुन्हा ही तपासणी सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे.
विदेशातून आले सात नागरिक
जळगाव जिल्ह्यातील सात नागरिक विदेशातून परतले आहे. यात मलेशिया, दुबई येथून हे नागरिक आलेले आहेत. यातील जळगावातील तरुण हा पुणे येथेच थांबून असून, चार भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे येथील चार तर चाळीसगाव येथील दोन नागिरकांचा समावेश आहे. तसेच काही दिवसांपूर्वी ब्रिटन येथूनही एक कुटुंब परतले आहे. यासह शोध घेण्याचे काम सुरू असून, या नागरिकांना २८ दिवस होम क्वारंटाइन राहायचे आहे. यात लक्षणे आढळल्यास तपासणी आणि कोणी बाधित आढळल्यास त्यांच्या एक स्वॅब पुणे येथे नव्या स्ट्रेन कोरोनाच्या तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.