जळगाव : जळगाव शहरासह सध्या ग्रामीण भागातदेखील कोरोना सुसाट आहे. त्यातच ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ट्रेसिंगची आकडेवारी ही फक्त कागदावरच राहत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहे. ग्रामीण भागात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यात शहरात जेवढे रुग्ण आढळत आहेत त्यापेक्षा कितीतरी जास्त रुग्ण हे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आहेत.
काही दिवसांपूर्वी चोपडा तालुका, चाळीसगाव तालुका हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. त्यात अनेक कोरोना बाधित हे विलगीकरणात राहत नसल्याचे तसेच रुग्ण आढळून आल्यानंतर त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग योग्य पद्धतीने होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत अजूनच भर पडत आहेत. चोपडा तालुक्यात दररोज ९० ते १०० रुग्ण आढळत आहेत. तर रावेर, मुक्ताईनगर, बोदवड हे कोरोनाचे नवे हॉटस्पॉट म्हणून समोर येऊ लागले आहेत. मंगळवारी मुक्ताईनगर तालुक्यात एकाच दिवशी तब्बल १९७ रुग्ण आढळून आले होते. तर रावेरमध्येदेखील ८३ रुग्ण होते. त्यामुळे आता कोरोनाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हाहाकार माजवल्याचे दिसून येत आहे. तरीही प्रशासन अजूनही योग्य प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करू शकलेले नाही.
गावांमध्ये लक्ष कोणाचे?
तालुक्यातील विविध गावांमध्ये सध्या स्थानिक स्तरावर आशासेविका, अंगणवाडी सेविका, स्थानिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याचे काम होत आहे. मात्र आरोग्य केंद्र हे तीन किंवा चार गावांचे मिळून बनलेले असते. मात्र तेथील अपुऱ्या स्टाफमुळे एवढ्या गावांकडे आणि त्यातील मोठ्या लोकसंख्येकडे लक्ष देणे सहज शक्य होत नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्ष जिल्ह्यातील १५ तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक रुग्ण आढळून येत आहेत. मात्र कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे जळगाव शहर, तालुक्याची ठिकाणी आणि मोठ्या गावांमध्येच दिसून येते. मात्र लहान गावात रुग्ण आढळून आला तरी त्याच्या संपर्कात कोण आला होता किंवा काय याची कोणतीही चौकशी केली जात नसल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा रेट १८.८
जिल्ह्यात एक रुग्ण आढळला तर त्यामागे जवळपास १८ ते १९ जणांची चौकशी होते. त्यानुसार दररोज जिल्ह्यात दहा हजारापेक्षा जास्त कोरोना चाचणी केली जात आहे. लहान गावांमध्ये स्टाफ कमी असल्याने काही समस्या असतात. मात्र प्रत्येक रुग्ण मागील पाच दिवसात कुठे गेला आणि तो कुणा कुणाला भेटला, याची चौकशी केली जाते.
- डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा आरोग्य
अधिकारी.