अमळनेर : प्रशासनाची नाकाबंदी, बाजारपेठेत गस्त आणि कारवाई, आरोग्य विभागाच्या सर्वाधिक चाचण्या आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे दि. २५ रोजी कोरोनाचा आकडा शून्यावर आल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र, यासोबत दक्षता घेण्याचे आवाहनदेखील प्रशासनाने केले आहे.
दि. २५ रोजी ग्रामीण भागात २७५ चाचण्या, तर शहरात ४६२ चाचण्या करण्यात आल्या. मात्र, दोन्ही ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या शून्य आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दुसऱ्या लाटेत २५ मे हा पहिला दिवस उजाडला आहे की, कोरोनाच्या रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीमुळे प्रशासन हतबल झाले होते.
अखेर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी लोकप्रतिनिधी आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, तसेच डीवायएसपी राकेश जाधव, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे तसेच शासकीय डॉक्टरांची बैठक घेऊन ‘कोरोना हटाव’ मोहीम हाती घेण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आणि कठोर कारवाया सुरू झाल्या. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना दंड, मोटारसायकल चालकांवर गुन्हे, नियम मोडून वारंवार दुकाने सुरू ठेवणाऱ्यांची दुकाने सील करणे, मास्क नसलेल्यांना दंड करणे, विविध भागात जाऊन अँटिजन चाचण्या करणे, बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांच्या भल्या पहाटे चाचण्या करणे, रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या चाचण्या करणे तसेच तातडीने उपचार करणे, नागरिकांतील कोरोनाची भीती दूर करून डॉक्टरांनाही योग्य उपचारांच्या सूचना देऊन कोरोना नियंत्रणात आला आहे. जास्तीत जास्त रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करता यावेत म्हणून लोकसहभाग देखील घेण्यात आला होता. त्यामुळे वेळीच उपचार होऊन संसर्ग रोखण्यात आला. रुग्ण संख्या शून्यावर आली असली तरी मास्क, सोशल डिस्टन्स आणि वारंवार हात धुणे या सूत्रीचा वापर करावाच, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.