लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : कोरोनाचा शेवटचा रुग्ण सापडून २१ दिवस झाले आता तरी शहरातील शाळा सुरू कराव्यात. ऑनलाईनमुळे मुलांचे नुकसान होत असल्याच्या भावना पालक आणि मुलांनी व्यक्त केल्या आहेत.
ग्रामीण भागात कोरोना संपला म्हणून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. आठवी ते बारावीची मुले शाळेत जाऊ लागली आहेत. ज्या शाळेतील शिक्षक किंवा कर्मचारी पॉझिटिव्ह आले तेथेदेखील शाळा चार दिवस बंद ठेवून शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मग शहरात रुग्ण नसतानादेखील शाळा का सुरू करण्यात येत नाहीत, असा सवाल आता पालक आणि विद्यार्थी विचारू लागले आहेत.
ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक दररोज शहरात बाजार, कामासाठी अमळनेर येत असतात.
जर लागण व्हायचीच होती तर आतापर्यंत ग्रामीण भागात लोण पसरले असते. मात्र तशी परिस्थिती नसल्याने शहरातील मुलांचे शैक्षणिक नुकसान का करीत आहेत, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
शहरात प्रत्येक मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल असला तरी मुले ऑनलाईन येऊन इतरत्र लक्ष केंद्रित करीत आहेत. दोन वर्षांपासून त्यांच्यातील शिस्त हरवली आहे. क्रियाशीलता शिथिल होत चालली आहे. काहींच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याने आता तरी शाळा सुरू करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ग्रामीण भागात शाळा खुल्या करण्यात आल्या परंतु शहरी भागात अजून एकही शाळा उघडली नाही. मी इयत्ता दहावीत शिकतो. तसे तर ऑनलाईन क्लास तर चालू आहे आणि तेही खूप चांगल्याप्रकारे, पण जी मजा शिक्षणात आली पाहिजे ती ऑनलाईन शाळेत येणे कठीण आहे.
- कृष्णा पाटील, विद्यार्थी, अमळनेर
ग्रामीण आणि शहरातील शाळाबाबत विषमता निर्माण झाली आहे. मुलांमध्ये हेवा निर्माण झाला आहे. एकाग्रता भंग होऊ लागली आहे. यामुळे त्यांच्या आयुष्यावर निश्चित परिणाम होतील. शाळा सुरू केल्याच पाहिजेत.
- डी.ए. धनगर, शिक्षक, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, अमळनेर
मुलांवाचून शाळा दोन वर्षांपासून सुन्या-सुन्या आहेत. त्यांच्यातील स्पर्धा, जिज्ञासा यामुळे शिक्षकदेखील सक्रिय असत. आता शिक्षकदेखील आळशी होत आहेत. त्यामुळे शाळा सुरूच केल्या पाहिजेत.
-एम. ए. पाटील, मुख्याध्यापक, शिवाजी हायस्कूल, अमळनेर
मुले घरात बसून ऑनलाईन अभ्यासामुळे घरकोंडे होत आहेत. त्यांच्यातील मूल्यांचा विकास थांबला आहे. त्यासाठी जेथे कोरोना नाही तेथे शाळा सुरू केल्याच पाहिजेत.
- एस. पाटील, पालक, अमळनेर