लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर महिन्यातील पहिल्या दहा दिवसात कोरोनाबाधितांचे प्रमाण हे वाढले आहे. समोर आलेले अहवाल आणि त्यांच्या आढळून येणारे बाधित हे प्रमाण ४.६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाण १ ते २ टक्क्यांवर होते. गेल्या दहा दिवसांचा विचार केला तर ९ डिसेंबरवगळता सर्वच दिवशी एक हजारांपेक्षा कमी चाचण्या नोंदविण्यात आल्या आहेत.
डिसेंबरच्या दहा दिवसांमध्ये ८३९८ चाचण्या झालेल्या आहेत. यात ३९० रुग्ण आढळून आले आहेत. यात सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी अधिक होत गेले आहे. चाचण्या घटल्यामुळे रुग्णसंख्या कमी येत असल्याचे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे. डिसेंबरच्या दहा दिवसांमध्ये बाधितांचे प्रमाण हे साडेतीन टक्क्यांवरच राहिले आहे. गुरुवारी तर हे प्रमाण साडेपाच टक्क्यांवर पोहोचले होते. त्यामुळे कोरोनाच्या बाबतीत आता निष्काळजीपणा हा धोकादायकच ठरू शकतो, असे चित्र आहे. कोरोनाचा आलेख खाली उतरताना दिसत असला तरी प्रमाण मात्र मध्यम स्वरूपात आहे. आकडेवारी बघितली असता कोरोना अगदीच वाढला किंवा अगदीच कमी झाला असे म्हणता येणार नाही.
दुसऱ्या लाटेला ब्रेक ?
अन्य देशांची व अन्य जिल्ह्यांची परिस्थिती बघता, जळगावातील स्थिती बघता दुसरी लाट ही अधिक धोकादायक असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, जिल्ह्यात थंडीचे प्रमाण घटल्याने कोरोनाला ब्रेक बसल्याचे सांगितले जात आहे. शिवाय हर्ड इम्युनिटी अधिक लोकांमध्ये विकसित झाल्यानेही हे प्रमाण अचानक न वाढता कमीअधिक होत असल्याचे सांगितले जात आहे.
असे राहिले दहा दिवस
१ डिसेंबर : बाधित - २८, चाचण्या - ५४५, पॉझिटिव्हीटी - ५.१३ टक्के
२ डिसेंबर : बाधित - ५४, चाचण्या -९८९, पॉझिटिव्हीटी - ५.४६ टक्के
३ डिसेंबर : बाधित -४०, चाचण्या - ९१५, पॉझिटिव्हीटी - ४.३७ टक्के
४ डिसेंबर : बाधित- ५५ , चाचण्या- ८२१, पॉझिटिव्हीटी - ६.६९ टक्के
५ डिसेंबर : बाधित - २४, चाचण्या - ६९८, पॉझिटिव्हीटी - ३.४३ टक्के
६ डिसेंबर : बाधित - ३६, चाचण्या - ८७२, पॉझिटिव्हीटी - ४.१२ टक्के
७ डिसेंबर : बाधित - ४०, चाचण्या - ९०४, पॉझिटिव्हीटी - ४.४२ टक्के
८ डिसेंबर : बाधित - ३४, चाचण्या - ७९३, पॉझिटिव्हीटी - ४.२८ टक्के
९ डिसेंबर : बाधित - ३६, चाचण्या - ११०३, पॉझिटिव्हीटी- ३.२६ टक्के
१० डिसेंबर : बाधित - ४३, चाचण्या - ७५८, पॉझिटिव्हीटी - ५.६७ टक्के