अमळनेर : येथील आमदार अनिल पाटील यांनी कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालय व आरोग्य विभागास आमदार स्थानिक विकास निधीतून १ ० लाखांचे साहित्य दिले.
तालुका आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय व पालिका रुग्णालय यांच्याकडे आमदार पाटील हे साहित्य सुपुर्द केले. आतापर्यंत आमदार स्थानिक विकासात एक कोटी रुपयांचा निधी कोरोनावर खर्च झाला आहे.
अँटिजन चाचणीसाठी शहरी भागासाठी ६ लाख व ग्रामीण भागासाठी ४ लाख असे एकूण १० लाख चाचणी किट्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी शहरी भागासाठी ६७,००० अँटिजन किट्स आमदार पाटील यांच्या हस्ते पालिका मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांना ग्रामीण रुग्णालय येथे सुपुर्द करण्यात आले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.प्रकाश ताळे, पालिका प्रशासन अधिकारी संजय चौधरी, पालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास महाजन, डॉ.आशिष पाटील, डॉ.अतुल चौधरी, विनोद कदम, प्रवीण पाटील, सचिन पाटील, ज्ञानेश्वर कुमावत, सुहास कोतकर आदी उपस्थित होते.
तालुक्यात पहिली लाट ओसरली. मात्र, दुसरी लाट तीव्र स्वरूपात होती. अनेक जण एकाच वेळी रुग्णालयात दाखल होते. शहरातील ग्रामीण रुग्णालय, इंदिरा भवन अशा ठिकाणी वाढीव सोय करण्यात आली होती, तरीही जागा अपूर्ण पडत होती. ऑक्सिजन सुविधा बेड, तपासणी साहित्य यासह विविध साहित्य आमदार स्थानिक विकास निधी, पालिका, दानशूर व्यक्ती व संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळाले. इतर साहित्य आमदार निधीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले गेले. सर्व शासकीय वैद्यकीय अधिकारी, शासकीय डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी, पालिका कर्मचारी, त्यामुळे तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात यश आले.
आता तिसरी लाट येऊ नये किंवा आल्यास तिला थोपविण्यासाठी येथे पूर्वतयारी सुरू झाली आहे. अँटिजन किटचा पुरवठा सद्यस्थितीत महत्त्वाचा आहे. शहरी भागात दररोज स्टेट बँके जवळ, खासगी प्रवासी बसेस थांब्यावर (कलागुरू मंगल कार्यालयाजवळ), ग्रामीण रुग्णालय, रेल्वे स्टेशन येथे, तसेच फिरत्या पथकाकडून बालेमिया, तिरंगा चौक येथे अँटिजन चाचण्या केल्या जात आहेत.