लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या कोरोनाने जळगावतही मोठे धक्के दिली. मात्र, कोरोनाची ही आपत्ती जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यास मात्र, फायदेशीर ठरली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पूर्णत: रुप पालटले असून ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क आणि अधिक सुटसुटीत आणि सोयीस्कर झाले आहे. कोरोनामुळे जिल्हाभरात ऑक्सिजन पाईपलाईनची व्यवस्था असलेले १ हजार बेड कायमस्वरूपी मिळाले आहेत.
याठिकाणी नॉन कोविड सेवा सुरू झाली असून त्यात अधिकाधिक सुटसुटीपणा आणण्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे गरीब, गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. केवळ वैद्यकीय सेवाच नव्हे तर स्वच्छता आणि सजावटीच्या दृष्टीनेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कात टाकली आहे. तासाभरात कोणताही रुग्ण मोकळा होईल, अशी व्यवस्था या ठिकाणी राबविण्यात येत आहे.
हे झाले मोठे बदल
१) ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली. असे साधारण एक हजार बेड तयार करण्यात आले आहेत.
२) आरोग्य केंद्रांमध्ये आता शस्त्रक्रियेची सेवा सुरळीत सुरू होत आहे. ग्रामीण रुग्णालयांमध्येही ८० व्हेंटीलेटर्स उपलब्ध झाले आहे. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात दोन बेडचा अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला आहे.
३) अनेक ठिकाणी दुरूस्त्या होऊन कामे मार्गी लागली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०० पेक्षा अधिक व्हँटीलेटर्स आलेले आहेत.
४)ऑक्सिजन टँक उभा राहिला असून ४०० बेडपर्यंत ऑक्सिजन पाईपलाईनची सेवा आहे. बेडची संख्या वाढविण्यात आली आहे.
५) आरोग्य यंत्रणेला पूर्णवेळ अधिकारी मिळाले असून दीड वर्षांपासूनचे रिक्त असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी पद भरले गेले. त्यामुळे प्रलंबित सर्व आरोग्यासंदर्भातील कार्यक्रम राबविणे आता सोपे झाले असून या कार्यक्रमांना टप्प्या टप्याने सुरूवातही होत आहे.