चाळीसगाव : कोरोना महामारी आणि टाळेबंदीमुळे सार्वजनिक कार्यक्रमांना ब्रेक लागल्याने दुधाच्या मागणीचा निर्देशांक मोठ्या प्रमाणात खाली कोसळला आहे. सद्यस्थितीत उत्पादन भरपूर आणि मागणी अत्यल्प, अशा चक्रात दूध व्यवसाय अडकला आहे. दुधाच्या वाहत्या पुराला कोरोनाने बांध घातल्याची वस्तुस्थिती आहे. अगोदरच अडचणींचे बांध असणाऱ्या चाळीसगावच्या दूधगंगेची अस्तित्वासाठी झुंज सुरु आहे. पशुखाद्याचेही भाव वधारले असून जिल्हा दूध संघाकडेदेखील दरदिवशी दीड लाख लिटर दूध शिल्लक राहत आहे. दि. १ जून रोजीच्या जागतिक दूध दिनी धवलक्रांतीची ही वाताहत म्हणूनच शोचनीय वाटते.
कोरोना महामारीच्या टाळेबंदीला आता १४ महिने पूर्ण झाले आहेत. सार्वजनिक उत्सव, सोहळे, सणवार, विवाह सोहळे, धार्मिक सोहळे आदींना बंदी असल्याने दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती थंडावली असून या व्यवसायावर मंदीचे सावट अधिक गडद झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या संख्येने दुधाची मागणी वाढते. ताक, लस्सी, आईस्क्रिम, दही या पदार्थांची तेजी असते. तथापि सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे या पदार्थांच्या मागणीला चाप लागला आहे. परिणामी अतिरिक्त दुधाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
चौकट
चाळीसगावच्या दूधगंगेला ओहोटी
एकेकाळी चाळीसगावच्या मिल्कक्रांतीने महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. मुंबईत चाळीसगावच्या दूधाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होती. दूध व्यवसायाच्या सुवर्णयुगात चाळीसगावहून मुंबईत एक लाखाहून अधिक लिटर दूध पोहोचविले जात होते. गत १५ वर्षांत ‘चाळीसगावची दूधगंगा’ आटली आहे. सद्यस्थितीत १० ते १५ दूध डेअरी सुरु असून दरदिवशी ४० ते ५० हजार लिटर दुधाचे संकलन होते. किरकोळ बाजारात दूध दराला तेजी असली तरी, घाऊक बाजारात मात्र फारसे भाव नाही. सहा रुपये ५० पैसे प्रति फॅट दराने दूध खरेदी केली जाते. गायीचे दूध २५ ते २६ रुपये लिटर आहे.
............
चौकट
हाती फक्त ‘शेणखतच’
गेल्या काही वर्षांत अस्मानी मार, नापिकी यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा थेट परिणाम पशुपालनावर झाला आहे. पशुपालनही संख्येने रोडावले आहे. पशुखाद्याचे दर चांगलेच वाढले असून उत्पादकांना कष्ट करुनही फारसे हाती काही लागत नाही. मिळणारा भाव आणि उत्पादन खर्च यांची बरोबरीच होते. पशुपालकांना नफ्यात फक्त जनावरांचे ‘शेणखतच’ मिळत असल्याची कैफियत पशुपालक मांडतात.
...........
चौकट
जिल्हा दूध संघाकडेही दरदिवशी दीड लाख लिटर दूध शिल्लक
जळगाव जिल्हा दूध संघाकडेही कोरोनामुळे मागणी घटल्याने दरदिवशी दीड लाख लिटर दूध शिल्लक असते. याच शिल्लक दूधापासून बटर आणि दूध पावडर बनवली जाते. तथापि, या पदार्थांचीही मागणी टाळेबंदीत कमी झाली आहे. २५ ते ३० टक्के दुधाची मागणी कमी झाली आहे. संघाकडे दरदिवशी तीन लाख लिटर दुधाचे संकलन होते. मागणी मात्र दीड लाख लिटर दुधाची होते, अशी माहिती संघाचे संचालक प्रमोद पांडुरंग पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
.........