जळगाव : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या सूचनेनुसार तालुकास्तर व जिल्हास्तरावर शिक्षणोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते़ परंतू, सध्या जगाने ‘कोरोना’ व्हायरसची धास्ती घेतली असल्यामुळे शिक्षण विभागाने सुध्दा खबरदारीच्या उद्देशाने ‘शिक्षणोत्सव’ कार्यक्रम स्थगित केला असून त्याबाबत गुरूवारी शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा विभागाच्यावतीने पत्रक जारी केले आहे़शिक्षक आणि मुलांच्या गुणवत्ता विकासासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांना विद्यार्थी, शिक्षक व पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा व तालुकापातळीवर शिक्षणोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाला कळविले होते़ त्यानुसार १४ ते १६ मार्चपर्यंत तालुकास्तरावर तर १९ ते २० मार्चपर्यंत जिल्हास्तरावर शिक्षणोत्सव घेतला जाणार होता़ त्यासाठी निधी सुध्दा उपलब्ध करून देण्यात आला होता़ मात्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी सर्वसामान्यांमध्ये जागरूकता करणे, वारंवार हात धुणे, आजारी असाल तर शाळेत येणे टाळणे, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही़ तोपर्यंत मोठी गर्दी जमणार नाही, अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवू नये अशाही सूचना केल्या आहेत़ त्यानुसार गुरूवारी डाएटच्या प्राचार्या डॉ़मंजुषा क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कोरोनाच्या सावटामुळे शिक्षणोत्सव स्थगित करण्याचा निर्णय घेतला़ त्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांना समग्र शिक्षा विभागातर्फे पत्र काढून पुढील आदेश होईपर्यंत शिक्षणोत्सव स्थगित करण्यात आल्याचे कळविले आहे़तारखा पुढे ढकलण्याची केली होती मागणीतालुकास्तरावर व जिल्हास्तरावर आयोजित शिक्षणोत्सव कार्यक्रम कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टळत नाही तोपर्यंत पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी बुधवारी जिल्हा शिक्षक सेनेच्यावतीने जि़प़ शिक्षण सभापती रवींद्र पाटील, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डी़एम़देवांग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती़ याप्रसंगी शिक्षकसेना जिल्हाध्यक्ष ईश्वर सपकाळे, सरचिटणीस राधेश्याम पाटील, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख संदीप पवार, जिल्हा कार्याध्यक्ष राजेश जाधव, सहचिटणीस वासुदेव चौधरी, उपाध्यक्ष उखर्डू चव्हाण, माध्यमिक शिक्षक सेना कार्याध्यक्ष गोविंदा पाटील, संघटक प्रदीप हिरोळे आदींची उपस्थिती होती़
‘कोरोना’च्या सावटामुळे शिक्षणोत्सव स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:19 PM