लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा सर्वाधिक धोका व लागण होण्याची सर्वाधिक भीती ही अन्य व्याधी असलेल्या रुग्णांना असते. त्यामुळे अशा ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील नागरिकांना कोरेाना प्रतिबंधात्मक लस दिली जात असून अशा रुग्णांनी मनात गैरसमज न ठेवता लस घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. लस ही शरीरात प्रतिकार क्षमता निर्माण करते, त्यामुळे कोरोना झाला तरी त्याचे स्वरूप गंभीर होणार नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
१ मार्च पासून जिल्ह्यात अशा नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी खासगी व शासकीय केंद्र ठरवून देण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पहिला व दुसरा डोज असे एकत्रित लसीकरण केले जात आहे. महिनाभरात हे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर सामान्यांचे लसीकरण सुरू होणार आहे. मात्र, अन्य व्याधी असलेल्या नागरिकांमध्ये कोरोना लसीकरणाबाबत गैरसमज असून यातून ते लसीकरणाला पुढे येत नसल्याचे चित्र आहे. मात्र, अशा नागरिकांनी लस घ्यायला हवी, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
थंडी, ताप आला तरी घाबरू नये
लस घेतल्यानंतर ज्यांची प्रतिकारक्षमता कमी त्यांना थंडी, ताप, अशी लक्षणे काही दिवस जाणवू शकतात. मात्र, अशा वेळी नागरिकांनी न घाबरता पॅरासिटॉमल किंवा ॲलर्जीची काही औषधे घ्यावी, मात्र, अन्य व्याधी असलेल्यांनी त्यांची नियमित औषधे ही सुरूच ठेवावी. थंडी, ताप हे अगदी सामान्य असून त्याला घाबरून जाऊ नये, असे डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले.
३४९६८
जणांनी आतापर्यंत लस घेतली
४०७१ ज्येष्ठ नागरिकांनी घेतली
तज्ज्ञ काय सांगतात
ज्येष्ठ नागरिक आणि अन्य व्याधी असलेल्या ४५ वर्ष वयावरील लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले आहे. कोविशिल्ड ही लस हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब अशा रुग्णांसाठी योग्य आहे. त्यामुळे मनात कुठलेही गैरसमज न ठेवता, न घाबरता लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. विवेक चौधरी, हृदयरोगतज्ज्ञ
अन्य व्याधी असलेल्यांसाठी लस योग्य आहे. लस ही शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण करीत आहे. आमच्या वडिलांनाही आम्ही लस दिली, लसीकरणाने कोरोना होणार नाही, असे नाही मात्र त्याचा गंभीरपणा कमी होईल. तुमचे शरीर लढण्यासाठी आधीच तयार राहील. - डॉ. अभय जोशी, युरॉलॉजिस्ट
अन्य व्याधी असलेल्यांनी न घाबरता, कुठलेही गैरसमज न ठेवता लस घ्यावी, लसीचे कुठलेही दुष्परिणाम नसल्याने अभ्यासकांचे म्हणणे आहे. कोविडचा सर्वाधिक धोका हा अन्य व्याधी असलेल्यांना असतो. त्यामुळे त्यांनी लस घेऊन याचे गांभीर्य कमी करावे व सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण करून घ्यावे. - डॉ. भाऊराव नाखले, विभाग प्रमुख, मेडिसीन