स्टार ८५४
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना काळात ज्या प्रमाणे विविध क्षेत्रावर परिणाम झाला त्याचप्रमाणे झोपेवरही परिणाम होऊन कौटुंबिक वातावरण बदलत आहे. एकतर कोरोनामुळे असलेल्या निर्बंधाने शाळा, महाविद्यालय बंद, अनेकांचे रोजगार थांबले यामुळे घरीच मोबाइलवर अधिक वेळ जात असल्याने त्याची जणू अनेकांना सवयच लागली आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचे संकट ओढावले व लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे शाळा, महाविद्यालय बंद होण्यासह अनेक व्यवसाय बंद झाल्याने जवळपास सहा महिने अनेक जण घरीच होते. यात शाळा, महाविद्यालय अजूनही बंद असल्याने लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वच जण घरीच आहे. या काळात वेळ कसा घालवावा, असा सर्वांपुढे प्रश्न आहे.
या सर्व प्रकारात अनेक जण मोबाइल, टीव्हीवर वेळ घालवू लागले. या प्रकाराला एक वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असली तरी अजूनही ही सवय कायम असल्याचे घरोघरी पहावयास मिळत आहे. यामुळे झोपेचे प्रमाण कमी झाले आहे व त्यामुळे शरीरावरही दुष्परिणाम होत आहे.
झोप का उडते?
१) कोरोना काळात स्क्रीन टाईम वाढला आहे. जास्त मोबाइल पाहिल्याने मेंदू जास्त उत्तेजित होतो. एक तास मोबाइल पाहिल्यास एक ते दीड कप कॉफी पिल्याची उत्तेजना मेंदूला मिळते. यामुळे झोप लागत नाही.
२) सध्या सोशल मीडियावर येणारे संदेश हे सर्वच शास्त्रोक्त असतात, असे नाही. वेगवेगळे भीती निर्माण करणारे संदेश वाचल्याने चिंता वाढते व त्यामुळे झोप लागत नाही.
३) लॉकडाऊनमध्ये काम नसल्याने अनेक जण मोबाइलवर राहू लागले. यामुळे दिनचर्या बदलली आहे.
नेमकी झोप किती हवी?
बालकापासून ते १२ वर्षांपर्यंत -१० ते १२ तास
१३ ते १८ वर्षे - ९ ते १० तास
१८ ते ६० वर्षे - सात तास
६१ वर्षांच्या पुढे - पाच ते सहा तास.
झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम
- झोपेमुळे ताण दूर होतो, मात्र सध्या पूर्ण झोप होत नसल्याने तणाव वाढत आहे.
- शारीरिक परिणाम होऊन ॲसिडिटी वाढते.
- एकाग्रतेवर परिणाम
- चिडचिड होणे
- रक्तदाब वाढणे, मधुमेहाची भीती.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको
झोप लागत नाही म्हणून अनेक जण गोळी घेत असतात. मात्र झोपेची गोळी नेहमी घेणे घातक ठरू शकते. तसेच वारंवार ही गोळी घेतल्याने त्याची सवय लागते. एखाद्यावेळी ही गोळी घेतल्यास काही हरकत नाही, मात्र दररोज घेऊ नये, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. झोपेची गोळी घ्यायची झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ती घेऊ नये, असा सल्लादेखील देण्यात आला आहे.
चांगली झोप यावी म्हणून
दिनचर्या व्यवस्थित असावी
रात्रीच्या जेवणानंतर कोणतेही स्क्रीन पाहू नये
तंबाखूजन्य पदार्थ, मद्य यांचे रात्री सेवन करू नये
झोपण्यापूर्वी वाचन करावे
झोपण्याच्या खोलीत झोपेसाठी पूरक वातावरण असावे
आवडते संगीत ऐका
आवडीचा परफ्यूम ठेवा
कोरोना काळात विद्यार्थी व इतरही जण घरी राहू लागल्याने मोबाइलवर वेळ घालविला जाऊ लागला. ती आता अनेकांना सवयच लागली आहे. यामुळे झोपेवर परिणाम होत आहे. झोप कमी झाल्याने शारीरिक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. आजार टाळण्यासाठी पुरेसी झोप घ्यावी व झोप लागण्यासाठी रात्री मोबाइल पाहू नये.
- डॉ. मयूर मुठे, मानसोपचार तज्ज्ञ