चाळीसगाव : दुस-या लाटेत कोरोना विरुद्धचा अॕक्शन प्लॕन तालुका आरोग्य विभागाने केला असून यामुळे संभाव्य तिस-या लाटेचीही खबरदारी घेतली जाणार आहे. माझे कुटूंब, माझी जबाबदारी यामोहिमेअर्तगत कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यात आढळणा-या संशयितांची कोरोना तपासणी केली जाणार आहे. आढळणा-या बाधितांवर तत्काळ उपचार केले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.शहर व तालुका परिसरात कोरोनाचा विळखा असून बाधितांची संख्याही दिवसागणिक वाढतच आहे. असे असले तरी कोरोनामुक्त होणा-यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून संभाव्य तिस-या लाटेबाबत बोलले जात आहे. यासाठी तालुका आरोग्य विभागाने तयारी केली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही कुटुंब सर्वेक्षण मोहीम बुधवार सुरू करण्यात आली आहे.२५५ पथके पिंजून काढणार तालुकाया सर्वेक्षण मोहिमेत कोरोना संशयित शोधले जाणार आहे. संशयित रुग्णांची तत्काळ टेस्ट करुन बाधित रुग्णांवर तातडीने उपचार केले जाणार आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि शिक्षक यांचा पथकात समावेश असून २५५ पथके तालुकाभरात घरोघरी जाऊन कुटुंबांचे आरोग्य रिपोर्ट कार्ड तयार करणार आहे. २८ एप्रिल ते दोन मे असे सहा दिवस हे सर्वेक्षण राबविले जात आहे. या सहा दिवसात कोरोनाची लक्षणे असणा-या संशयितांचा शोध घेतला जाणार आहे. शुक्रवारी अचानकपणे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, डॉ. देवराम लांडे यांनी वडगाव लांबे, रहिपुरी आदी गावांमध्ये जाऊन सर्वेक्षणाचा आढावा घेतला. यावेळी सर्वेक्षण करणा-या कर्मचा-यांना योग्य त्या सूचनाही केल्या.
चाळीसगावला संशयितांची करणार कोरोना टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 2:22 PM
चाळीसगावला संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे२५५ पथकांव्दारे सर्वेक्षण माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम