लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : राज्यात संचारबंदी चालू असताना अनेकजण गावात विनाकारण फिरताना दिसून येत आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांची पालिका पथकाकडून जागेवर कोरोना चाचणी केली जात आहे. जर या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, तर त्यांची रवानगी शासकीय वाहनातून थेट कासोदा रोडवरील कोविड सेंटरला केली जाणार असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांनी दिली.
पोलीस व नगर पालिका प्रशासनाकडून आता संचारबंदीत विनाकारण फिरणारे व नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत यावेळी त्यांनी दिले. अनेकांना समजावून सांगितले जाते तरी त्यांच्या लक्षात येत नसल्याने आता बाजारपेठसह शहरातील मुख्य रस्ते महामार्ग बसस्थानक, याठिकाणी विनाकारण गर्दी करणारे,विना मास्क फिरणारे या सर्वांवर विशेष लक्ष राहणार आहे.
याची जागेवर कोरोना चाचणी केली जाणार आहे. पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्यास कोविड सेंटरला १४ दिवस ठेवण्यात येणार आहे .दिनांक १५ रोजी शहरात बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्या ८ जणांना ताब्यात घेऊन त्यांची जागेवर कोरोना चाचणी करण्यात आली.