गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून जळगावसह राज्यातील विविध आगारातील चालक-वाहक एक आठवडा सेवा बजाविण्यासाठी मुंबई येथे जात आहेत. मुंबईतून आल्यानंतर या कर्मचाऱ्यांची जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करुन, अहवाल येईपर्यंत तीन दिवस कामावर न बोलावता गृहविलगीकरणात राहण्याच्या सुचना करण्यात येत आहेत. मात्र, पुणे येथे गेल्या आठवड्यात २९ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी बेस्ट सेवेसाठी मुंबई, वरळी येथे गेलेल्या चालक - वाहकांना मुंबईहून परतल्यानंतर कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यक नसल्याच्या सुचना केल्या आहेत. त्या सुचनांच्या आधारे राजेंद्र देवरे यांनी जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापकांना पत्र पाठवून, मुंबईतून परतलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी न करता, त्या कर्मचाऱ्यांवर नियोजित कामगिरी सोपविण्याच्या सुचना केल्या आहेत.
इन्फो :
सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचा संताप
विभाग नियंत्रकांनी आगार व्यवस्थापकांना पाठविलेले पत्र सोशल मीडियावर शुक्रवारी चांगलेच व्हायरल झाले. जिल्ह्यातील विविध आगारातील चालक-वाहकांनी कामगार संघटनांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर या पत्रावर तीव्र नाराजी अन् संताप व्यक्त करतांना दिसून आले. जर मुंबईहून परतल्यानंतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होत नसेल, तर महामंडळ कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
दरम्यान, या पत्राबाबत विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्यांशी ` लोकमत` प्रतिनिधीने दुरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.