लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दुसऱ्या लाटेत अतिशय वेगाने पसरलेल्या कोविडमुळे जिल्ह्यात मोठी दहशत पसरली होती. मात्र, त्याच वेगाने ही लाट ओसरलीही. जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या १५ लाखांवर पोहोचली असून पॉझिटिव्हिटी एक टक्क्याच्या खाली कायम आहे. शिवाय गेल्या दीड महिन्यापासून एकही मृत्यू नसल्याने मोठा दिलासा जिल्ह्याला मिळाला आहे.
जिल्ह्यात मार्च व एप्रिलमध्ये कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयावह स्थितीत आलेली होती. याच दोन महिन्यांमध्ये रुग्णसंख्या व मृतांची संख्या प्रचंड वाढलेली होती. यात कमी वयातील रुग्णांचेही मृत्यू झाले. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली असून, गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून अहवालांमधील बाधितांचे प्रमाण हे एक टक्क्याच्याही खाली नोंदविण्यात येत आहे. त्यात १६ जुलैपासून सातत्याने रुग्णसंख्या ही एका दिवसात १० पेक्षा कमीच नोंदविली जात आहे. मध्यंतरी बोदवडमध्ये अचानक रुग्णवाढ समोर आली होती. मात्र, त्या ठिकाणीही परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे. आता नियमित दोन ते पाच रुग्ण बाधित आढळून येत आहेत. यात प्रथमच सक्रिय रुग्णांची संख्या ही २३ वर पोहोचली आहे.
चाचण्यांचे प्रमाण वाढले
मध्यंतरी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले होते. त्यामुळे रुग्णांचे लवकर निदान होऊन त्यांना तातडीने अलग करण्यात यश आल्याने पुढील धोके टाळता आले. आता सर्व कोविड सेंटर बंद असून, रुग्णालयातही रुग्णांची संख्या कमीच असून, सक्रिय रुग्णांपैकी अधिकांश रुग्ण हे गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
पॉझटिव्हिटी
२२ ऑगस्ट : ०.१५ टक्के
२३ ऑगस्ट : ०.४५ टक्के
२४ ऑगस्ट : ०.१२ टक्के
२५ ऑगस्ट : ०.१८ टक्के
२६ ऑगस्ट : ०.१३ टक्के
अशी आहे चाचण्यांची संख्या
आरटीपीसीआर : ५२०९०७, पॉझिटिव्ह : ५७८८४, प्रमाण : ११.११ टक्के
ॲन्टीजन : ९८२५७१, पॉझिटिव्ह : ८४८०८, प्रमाण : ८.६३ टक्के