लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वाढल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. ही तब्बल सहा ते आठ पटीने अधिक मागणी वाढल्याने जीएमसीला ऑक्सिजन लिक्विडचा तसेच अन्य काही ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या पुरवठाराला आता अन्य राज्यातून हा माल आणावा लागत आहे. दरम्यान, अशीच स्थिती राहिल्यास ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आता पूर्णत: कोविड रुग्णालय झाल्यानतर ऑक्सिजनच्या मागणी मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. डिसेंबर, जानेवारीत शंभर दीडशेवर सिलिंडर लागत होते. तीच मागणी आता ९०० सिलिंडर प्रति दिवस इतकी झालेली आहे. शिवाय अन्य ठिकाणीही ही मागणी वाढली आहे. दिवसाला १२०० सिलिंडरचा पुरवठा करावा लागत असल्याची माहिती आहे. दरम्यान, नियमीत आठ टन लिक्विड ऑक्सिजन टँकमध्ये भरण्यात येत आहे.
या राज्यातून पुरवठा
महाराष्ट्रात पुरेसे ऑक्सिजन मिळत नसल्याने गुजरात, मध्यप्रदेश, झारखंड आदी राज्यांमधून त्याची व्यवस्था करावी लागत आहे. ही अत्यावश्यक बाब असल्याने काहीही करून त्याची जुळवा जुळव करावी लागत असल्याचे पुरवठादारांचे म्हणणे आहे. मागणी सहा पट वाढली असताना कंपन्या मात्र, तेवढ्याच आहेत. त्यामुळे तुटवड्याची परिस्थिती उद्भवू शकते, असेही सागितले जात आहे. शिवाय किमतीतही अडीच पटीने वाढ करण्यात आली आहे. साधारण १५ फेब्रुवारीपासून हे चित्र पूर्णत: बदलले आहे.
नोव्हेंबर ते जानेवारी : २५० वरून १०० सिलिंडर वापर
१५ फेब्रुवारीपासून ते मार्च सुरवातील : ४०० सिलिंडर
सद्यस्थितीत ९०० सिलिंडर प्रतिदिवस