लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव शहरात कोरोना नियंत्रणात येत असून, शनिवारी १६ रुग्ण आढळून आले आहेत. नियमितपेक्षा ही संख्या दुपटीने कमी आली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात प्रथमच जळगाव शहरापेक्षा भुसावळात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे. भुसावळात सद्य:स्थितीत ९११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जळगावातील ही संख्या मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे.
जळगावात एका बाधिताच्या मृत्यूची नोंद आहे. ग्रामीण भागात ८ नवे रुग्ण आढळले, तर २६ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण कमी असल्याने शहरातील अनेक खासगी कोविड हॉस्पिटल बंद होत आहेत. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ६२७ वर पोहोचली असून, यातील बहुतांश रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे यंत्रणेवरील ताण कमी होत आहे. आठवडाभरात शहरात रुग्णसंख्या ही शंभरापेक्षा खालीच नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाचा आलेख घसरत आहे. मात्र, नागरिकांनी निर्बंध पाळणे अत्यंत गरजेचे असून, गाफील राहू नये, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सर्व नऊ मृत्यू जीएमसीत
रावेरात सर्वाधिक ३ मृत्यू झालेले आहेत. यासह जामनेर तालुक्यातील २, मुक्ताईनगर तालुक्यात २, जळगाव शहर व यावल तालुक्यात प्रत्येकी १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हे ९ मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच झालेले आहेत.
नॉन कोविड म्युकरमायकोसिस कक्षाच्या हालचाली
कोविडमधून बरे झालेल्या रुणांना म्युकरमायकोसिस झाल्यास त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार मिळत नाहीत. अशा स्थितीत अशा रुग्णांसाठी एक स्वतंत्र कक्ष असावा, अशा हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून तशा सूचना जीएमसीला प्राप्त झाल्याचे समजते. सद्य:स्थितीत कक्ष ७ मध्ये ८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, या रुग्णांवर कोविडचेही उपचार सुरू आहेत. नॉन कोविड असल्यामुळे म्युकरमायकोसिसवर उपचार होत नसल्याने पाचोरा येथील एका महिला रुग्णाची उपचारासाठी फिरफिर झाल्याची शिवाय इंजेक्शन मिळत नसल्याची घटना शुक्रवारी घडली हाेती.