लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा शल्यचिकित्सक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समन्वयाच्या अभावामुळे कोरोना लसीकरण केंद्राच्या जागेबाबत पोरखेळ सुरू असून दोन दिवसांपूर्वीच दिव्यांग बोर्डाच्या जागेत या केंद्राचे स्थलांतर करण्याच्या निर्णयात पुन्हा बदल करण्यात आला असून आता हे केंद्र रेडक्रॉस सोसायटीच्या ब्लडबॅंकेत स्थलांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे केंद्र रोटरी भवनातून हलविण्यावरून मोठे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी हे केंद्र दिव्यांग बोर्डात सुरू करण्याबाबत पत्र दिले होते. मात्र, या ठिकाणी पुरेशी व्यवस्था नसणे, बाधित रुग्णांचा वावर या बाबींमुळे आता हे केंद्र अखेर रेडक्रॉस रक्तपेढीत सुरू करण्यात येणार आहे. यात प्रशासकीय समन्वयाचा अभाव समोर आला असून यामुळे आता सोमवारी हे केंद्र बंदच राहणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिसऱ्या मजल्यावर लसीकरण केंद्र असल्याने ज्येष्ठांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे हे केंद्र आठवडाभरापूर्वी रोटरी भवनात हलविण्यात आले होते. त्यानंतर ११ मार्चला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी पुन्हा हे केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग बोर्डात सुरू करण्यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षकांना पत्र दिले होते. मात्र, या ठिकाणी अडचणींचा मोठा डोंगर असल्याने रुग्णालय प्रशासनापुढे हा मोठा पेच निर्माण झाला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या केंद्राची पाहणी केली. काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी तपासणी केली. व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर रेडक्रॉस रक्तपेढीत हे केंद्र सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, सोमवारी आता याबाबत निर्णय होऊन मंगळवारपासून रेडक्रॉस रक्तपेढीत हे केंद्र सुरू होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
अडचणींचा डोंगर
दिव्यांग बोर्डाच्या ठिकाणी एक सभागृह आहे. केंद्राला एक प्रतीक्षागृह, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष अशा तीन कक्षांची व्यवस्था आवश्यक असते. शिवाय या केंद्राच्या वरच्या मजल्यावर काम सुरू आहे. यासह शेजारी सी १ हा बाधित रुग्णांचा कक्ष असल्याने रुग्णांचा वावर या ठिकाणांहून होऊ शकतो, अशा स्थितीत ज्येष्ठ नागरिकांना बाधा होण्याची शक्यता होती. या काही अडचणींमुळे अखेर हा निर्णय बदलविण्यात आला आहे. मात्र याचा विचार आधीच का झाला नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.
एक केंद्र, फेऱ्या अनेक
६ मार्च रोजी रोटरी भवनात रात्री सर्व साहित्य हलविले
१२ मार्च रोजी केंद्र हलविण्यासंदर्भात पत्र काढण्यात आले.
१३ मार्च रोजी रोटरी भवनातील सेटअप काढण्यात आला
१४ मार्च रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केंद्राची पाहणी केली.
१६ मार्च रोजी आता रेडक्रॉस रक्तपेढीत हे केंद्र सुरू होणार