लाेकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असून स्थानिक आरोग्य प्रशासनाने त्या दृष्टीने उपाययोजनांना सुरुवात केलेली आहे. जिल्ह्यातील १३ केंद्रांवर दररोज १,३०० डोस असे १५ दिवस हे लसीकरण सुरू राहणार आहे. लसीचे हे डोस जिल्हा रुग्णालयातील व्हॅक्सीन सेंटरमध्ये ठेवता येणार आहे.
जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी अशा १९ हजार ७३५ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी नुकताच चार केंद्रांवर लसीकरणाचा ड्रायरनही घेण्यात आला होता. माहिती पाठविणे, कोविन ॲपबाबत, लस टोचण्याबाबत, डोसेबाबत, प्रशिक्षणही पूर्ण झाले असून यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली. लसीचे १९ हजार ७३७ डोस जळगावात येणार आहे. महिनाभराच्या अंतराने दुसरा डोस द्यायचा असल्याने उर्वरित डोस हे महिनाभरानंतर येणार असल्याची माहिती आहे.
या केंद्रावर लसीकरण
जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महापालिकेचे नानीबाई रुग्णालय आणि डी. बी. जैन रुग्णालय, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर या तीन उपजिल्हा रुग्णालयांसह चाळीसगाव, रावेर, पिंपळगाव हरेश्वर, न्हावी ग्रामीण रुग्णालय, भुसावळ येथील नगरपालिका रुग्णालय, पारोळा येथील कुटीर रुग्णालय यानुसार तेरा केंद्रांवर कोरोना लसीकरणा होणार आहे.
कोट
१३ केंद्रांवर रोज १,३०० डोस असे पंधरा दिवस हे कोरोना लसीकरण सुरू राहणार आहे. जिल्हा रुग्णालयातील व्हॅक्सीन सेंटरमध्ये हे डोस ठेवले जाणार आहे. कुठली लस येईल, अद्याप त्याबाबत सूचना नाहीत.
- डॉ. एन. एस. चव्हाण,
जिल्हा शल्य चिकित्सक