जळगाव : रेल्वे सुरक्षा बलातर्फे जळगाव रेल्वे स्टेशनवरील सर्व रेल्वे पोलिसांना नुकतीच कोरोना लस देण्यात आली. शहरातील एका खासगी रुग्णालयात टप्प्या-टप्प्याने रेल्वे पोलिसांना ही लस देण्यात आली. लवकरच इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनाही ही लस देण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
जनता कर्फ्यू नंतर बसेसच्या फेऱ्या वाढवल्या
जळगाव : जळगाव शहरात तीन दिवस जनता कर्फ्यूमुळे ग्रामीण भागातील अनेक बस फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. मात्र, जनता कर्फ्यू संपल्यानंतर जळगाव आगारातर्फे पुन्हा ग्रामीण भागातल्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. दरम्यान, मास्क असल्यावरच प्रवाशांना बसमधून प्रवास करण्यास प्रवेश देण्यात येत आहे.
महामंडळातर्फे प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या सूचनेनुसार जळगाव आगारातून बाहेर गावी जाणाऱ्या प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच बस स्थानक परिसरही दररोज निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. यासाठी आगार प्रशासनातर्फे स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या खबरदारीचे प्रवाशांमधून कौतुक होत आहे.
जुन्या बस स्थानकासमोर थाटले अतिक्रमण
जळगाव : जुन्या बस स्थानकातून गेल्या महिन्यापासून ग्रामीण भागातील काही गावांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. मात्र, या स्थानकाबाहेर रस्त्यावर विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे प्रवाशांना स्थानकात येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे मनपाने या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
अवजड वाहतुकीमुळे कोंडी
जळगाव : जळगाव शहरातून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरी देखील अवजड वाहने फुले मार्केट, जुने बसस्थानक परिसरात व्यापाऱ्यांचा मालाच्या वाहतुकीसाठी वाहतूक करीत आहेत, परिणामी यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. तरी वाहतूक विभाग प्रशासनाने या वाहन धारकांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.