लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी लस घेणाऱ्यांचा आकडा घसरला. ७०० पैकी केवळ ३९७ लोकांनी लस घेण्यास प्रतिसाद दिला. अन्य कर्मचाऱ्यांनी मात्र, लसनंतरच हा पवित्रा घेतला. यात चाळीसगावात सर्वात कमी १७ जणांनीच लस टोचून घेतली तर एका कर्मचारी महिलेला रिॲक्शन आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बुधवारी पुन्हा लसीकरण होणार आहे.
डी. बी. जैन रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सकाळी दहापासून लसीकरणाला प्रारंभ झाला. खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनीही लसीकरण करून घेतले. यात डी. बी. जैन रुग्णालयात आयएमएचे सचिव डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. नंदिनी पाटील, डॉ. अनिल पाटील, डॉ. नीरज चौधरी, डॉ. भरत बोरोले, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. सोनल बोरोले, डॉ. अनुराधा पाटील, डॉ. अमित राजपूत, डॉ. कीर्ती देशमुख यांनी लस घेतली.
म्हणून संख्या १७
चाळीसगावला रुग्णालयात कार्यरत एका परिचारिकेला लस घेतल्यानंतर व्रण तसेच श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. काही तासांनी त्या सामान्य झाल्या, मात्र, या घटनेमुळे चाळीसगावात लसीकरणाला येणाऱ्यांची संख्या घटून १७ वर राहिली.
एसएमएस नसला तरी लस घेता येणार
लसीकरणात ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. अशांना एसएमएस नसला मात्र, त्यांची लस घेण्याची इच्छा असल्यास ते स्वत: केंद्रावर जाऊन लस घेऊ शकणार आहेत. हा नवीन पर्याय मंगळवारपासून लागू करण्यात आला आहे. तीन वाजेनंतर अशी लस देता येणार आहे. यात कोणतेही नोंदणीकृत आरोग्य कर्मचारी लस घेऊ शकणार आहेत. त्यानुसार काही खासगी डॉक्टरांनी आज लस घेतली.
असे झाले लसीकरण
जीएमसी - ६३, डी. बी. जैन रुग्णालय - ६२, जामनेर उपजिल्हा रुग्णालय -५१, चोपडा उपजिल्हा रुग्णालय ८९, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय १७, पारोळा ग्रामीण रुग्णालय ६२, भुसावळ ग्रामीण रुग्णालय ६२
लक्षणे नाहीत
दुसऱ्या दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वीस डॉक्टरांसह ६३ जणांनी लस टोचून घेतली. यात कोणालाही सौम्य लक्षणेही जाणवली नसल्याची माहिती आहे. कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. नितीन विसपुते यांनी सकाळी दहा वाजता पहिली लस घेतली. त्यांना तातडीने प्रमाणपत्रही देण्यात आले.
जीएमसीत या डॉक्टरांचा पुढाकार
उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. नितीन विसपुते, डॉ. दीपक जाधव, डॉ. विजय कुरकुरे, डॉ. अजय सोनवणे, डॉ. प्राची सुरतवाला, डॉ. सचिन अहिरे, डॉ. सुशांत सुपे, डॉ. रेणुका भंगाळे, डॉ. वृषाली सरोदे, डॉ. शैलजा चव्हाण, डॉ. हितेंद्र भोळे, डॉ. नरेंद्र भोळे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. शिल्पा राणे, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. अभिजित पाटील, डॉ. रेश्मा उपाध्याय, डॉ. शैलजा जावळे यांनी दुसऱ्या सत्रात लस टोचून घेतली.
पंधरा, वीस मिनिटेच 'वेट'
निरीक्षण कक्षात अर्धा तास थांबणे बंधनकारक असताना जीएमसीत काही डॉक्टर व काही कर्मचाऱ्यांनी दहा ते वीस मिनिटाच्या आतच येथून काढता पाय घेतला. विशेष बाब म्हणजे शेवटच्या कर्मचाऱ्याला ५.०६ वा. लस देण्यात आली मात्र, तेव्हा निरीक्षण कक्षात एकही डॉक्टर नव्हते. आणि हे लाभार्थीही ५.२५ वा. निघून गेले. त्यांच्या नावापुढे रजिस्टरमध्ये ५. ३६ वा. ची नोंद झाली आणि ५.३१ वा. सत्र बंद करण्यात आले.
सर्व सुरळीत, लाभार्थीच येईनात
मंगळवारी ॲप, लस देण्यासाठी यंत्रणा सर्व वेळेवर सुस्थितीत उपलब्ध होते. मात्र, लाभार्थीच नसल्याने केंद्रावर उशिरा सुरुवात झाली होती. सकाळी साडे अकरापर्यंत डी.बी. जैन रुग्णालयात केवळ सहा तर जीएमसीत केवळ चार लाभार्थी झालेले होते. डी. बी. जैन रुग्णालयात दुपारी साडेबारा वाजता प्रमाणपत्र डाऊनलोड होण्यास काहीशा अडचणी आल्या होत्या. तेव्हा केवळ नोंदणी करून लस दिली जात होती. प्रमाणपत्र मात्र, दिले जात नव्हते.