लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : घरातील महिला कोरोनामुळे दवाखान्यात दाखल असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना २ ते ३ एप्रिलदरम्यान आर. के. नगर भागात घडली.
शहरातील आर. के. नगर भागात कंपनीच्या समोर जितू वॉशिंग सेंटरच्यावरच्या मजल्यावरील संगीता उर्फ आशा राजाराम लोहार याना कोरोना झाल्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले व त्यांच्यासोबत घरात राहणाऱ्या महिलांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून विलगीकरणासाठी बाहेरगावी पाठवण्यात आले होते. याच संधीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने बंद घराचे दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून १७ हजार ५०० रुपयांचे ५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, ८७ हजार ५०० रुपयांचे २५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, ३५ हजार रुपयांचे १० ग्रॅम वजनाचे कानातील झुमके, १७ हजार ५०० रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि ३५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
घटनेचे वृत्त कळताच डीवायएसपी राकेश जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश परदेशी यांनी भेट देऊन पाहणी केली. वॉशिंग सेन्टरवरील काम करणाऱ्या सैय्यद फारूकअली असगरली यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.