प्रसंग दोन : कोरोनामुळे जीवनव्यवहार बंद. शाळा-महाविद्यालयेही बंद. त्यामुळे दहावीतील ती विद्यार्थिनीसारखी घरात मोबाइल, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ती अभ्यास पूर्ण करू इच्छीत होती. पण घरच्यांची खूप बंधनं. त्यांनी तिचा ‘ऑनलाइन’ असलेला खासगी क्लास बंद केला. भीतीने मैत्रिणींशी बोलणं बंद करायला लावलं. ती सारखी घरात. शेवटी तिची मनस्थिती बिघडली. सध्या तिच्यावर दवाखान्यात औषधोपचार सुरू आहेत.
-वरील दोन्ही प्रसंगांबाबत सांगायचं तर कोरोना काळातील बालक-पालक संबंधात कुठे गोडवा, तर कुठे कटुता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये जी सर्जनशीलता आहे ती जिवंत ठेवण्याची, विद्यार्थ्यांच्या शंकांना प्रश्नांना उत्तरं देण्याची, सुसंबंद्ध प्रश्न विचारण्याची व त्यांना विविध समस्यांवर विचार करण्याची मुभा दिली पाहिजे. ती खूपशा घरांमध्ये दिली जात नाहीये. उलट ऑनलाइन शिक्षणामुळे जो स्क्रीनटाइम वाढलाय त्याबद्दल खूप बोललं जातंय. स्मार्टफोन, संगणक यांचा लहान मुलांकडून होणारा वाढता वापर हा समाजात (प्रचंड) चिंतेचा विषय बनलाय आणि टाळेबंदीच्या निमित्ताने शाळा आणि खासगी शिकवणीवर्ग विद्यार्थ्यांवर ‘ऑनलाइन’ शिक्षणाचा भडीमार कसा करताय यावरही खूप बोललं जातेय. एक गोष्ट तेवढीच खरी आहे की, विद्यार्थ्यांच्या वयानुसार ऑनलाइन शिक्षणाचा दिवसभरातील कालावधी ठरविण्याबाबत विचार कुणीही केला नाही आणि तासन्तास स्क्रीनसमोर बसवण्याची मुलांची खरंच क्षमता नसते, हेही आम्ही ध्यानी घेतले नाही. असो.
इथे विनोबा भावेंचा एक शिक्षणविचार मला द्यावासा वाटतो. ते म्हणायचे, ‘घर शाळेत शिरलं पाहिजे आणि शाळा घरात घुसली पाहिजे’ विनोबांना यातून काय सांगायचे होते, की शाळा आणि घर यांच्यातले द्वैत नाहीसे होत त्या दोहोंत ‘सांगड’ घातली गेली पाहिजे. कोरोनाकाळात नेमकी हीच ‘सांगड’ ना पालकांनी आपल्या पाल्याबाबत, ना शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांबाबत घातली नाही. वा तसे उपक्रम, प्रयोग समोर ठेवत त्या-त्या वयोगटांतील मुलांना प्रोत्साहित केले नाही. (जे प्रयोग झालं ते जेमतेम ३० टक्के झालेत.)
-अस म्हटलं जात की, मुलांना अगोदर ‘जीवनाची’साधी पण महत्त्वपूर्ण ओळख करून द्या. नंतर पाठ्यपुस्तकं, अभ्यासक्रम, पाठांतर यांची रितसर, तीदेखील ‘कृतींद्वारे’ ओळख करून द्या. पण आपण नेहमीच थेअरीला महत्त्व देत प्रॅक्टिकलला मागे सारतो, जी बाब पूर्णत: विसंगतीने भरलेली आहे. खरं पाहिलं तर काळ कोरोनाचा असो वा नसो. आम्हा पालकांना मुलांची ‘परिभाषा’ समजावून घेत त्याचा नीटसा अर्थ लावता येत नाही. सुसंवाद साधत छोटे-छोटे प्रश्न सोडविता येत नाहीत.
- ‘मैने सुना, भुल गया । मैने देखा, याद रहा। मैने करकेे देखा, मै समझ गया।।’ हा जो मंत्र आहे, त्यातील ‘मैने करके देखा, मै समझ गया ।’ हा भाग खूपच महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती, समजशक्ती, अभिव्यक्तीची शक्ती ओळखत, आपल्या पाल्यांना ‘पुढे व्हा’ हा मंत्र देतात तेव्हा तेेव्हा ती मुलं पुढे जातात. कोरोनाकाळात नेमकी हीच गोष्ट पालक विसरला. (म्हणूनच मी सुरुवातीला दोन प्रसंग दिलेत) वा आजूबाजूच्या परिस्थितीने गोंधळत मुलांनाही त्यात सामील करून घेत अधिक गोंधळाचं वातावरण तयार करती झाली. असो.
शेवटी अजून एक मुद्दा. सतत स्क्रीनकडे पाहिल्याने मुलांना डोळ्यांचे, पोटाचे वा एकूण शरीराचे जे वेगवेगळे विकार जडले ते खुपदा घरीदारी दुर्लक्षिले गेले. त्यांनी समाजमाध्यमे, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांच्या माध्यमांतून डॉक्टरांंनी वा तज्ज्ञांनी जे विचार मांडले ते नीट समजावून घेतले नाही, पण आज कोरोनोत्तर जे शैक्षणिक प्रयोग सुरू आहेत ते खरंच कौतुकास्पद आहेेत. तसेच ऑनलाइन शिक्षणाची व्यवहार्यता ओळखत जी पावले टाकली जाताय तीदेखील चांगली आहेत. डिजिटल शिक्षणातही विद्यार्थी घडतो, हेही ते दाखवून देताय. (अर्थात् यात एक वादाचा मुद्दा आहेच, तो म्हणजे शहरी भाग व ग्रामीण भाग).
-चंद्रकांत भंडारी,
शिक्षणतज्ज्ञ, जळगाव